सातारकरां तर्फे मधु नेने यांचा मानपत्र देऊन गौरव-डॉ सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान.
सातारा –आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारकर नागरिकांतर्फे ज्येष्ठ लेखक व समर्थ भक्त मधु नेने यांचा गौरव करण्यात आला.येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ विचारवंत,साहित्यिक प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते मधु नेने यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा साताराचे उपाध्यक्ष श्रीकांत देवधर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे होते.व्यासपिठावर आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री, समन्वयक श्रीराम नानल,दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष व मसाप चे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी आज सर्वच क्षेत्रांत पाट्या टाकण्याचे काम जोरात सुरू असताना मधु नेने यांच्या पत्रकारितेचे आणि त्यांच्या एकूणच कामाचे वेगळेपण निश्चितच आहे हे विशद केले.कोणत्याही प्रकारचे लेखन करताना नेने यांनी नेहमीच सखोल अभ्यासपूर्वक लिहिले आणि तेच त्यांचे बलस्थान आहे. त्यांच्या लेखणीने अनेक विषयांना हात घातला आणि वाचकांप्रती त्यांची निष्ठा कायम राहिली.नेने यांनी नुसती पाटी न टाकता ती
आशयसमृद्धतेने भरून टाकली. त्यांनी स्थानिक पातळीवर काम केले असले तरी त्यांचे लेखनविश्व विस्तारत राहिले असेही प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. मधू नेने यांच्या एकूण कार्याचा गौरव करताना मधू नेने एक व्यासंगी लेखक आहेत आणि पत्रकार म्हणून विविध दैनिकांमध्ये त्यांनी यशस्वी कारकीर्द केली असे त्यांनी सांगितले.आगामी कालावधीमध्ये मधू नेने यांच्याकडून अजून भरीव लेखन कार्य व्हावे अशा शुभेच्छा यावेळी डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी दिल्या.डॉ संदीप श्रोत्री यांनी त्यांच्या संदर्भातील वाई मधील आठवणी सांगितल्या.प्रमुख पाहुणे श्रीकांत देवधर यांनी मधू नेने यांच्याशी निगडित काही आठवणींचा उजाळा दिला.अध्यक्ष श्रीकांत कात्रे यांनी आपल्या भाषणामध्ये मधू नेने यांना शुभेच्छा देताना त्यांच्या लेखन कार्याचा आणि बँकिंग क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
यावेळी सुनीलकुमार कुमार लवटे यांच्या हस्ते विक्रमवीर गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी आणि सातारा नाट्य चळवळीशी निगडित कल्याण राक्षे यांचा सत्कार करण्यात आला.मधू नेने यांना जे मानपत्र अर्पण करण्यात आले त्याचे लेखन श्रीराम नानल यांनी केले होते आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या मानपत्राचे वाचन शिरीष चिटणीस यांनी केले.यावेळी ते म्हणाले,पुस्तके-कविता-व्याख्याने-सादरीकरण वर्तमान मांडत असतात.वर्तमानाची इतिहासात रुजलेली पाळेमुळे शोधून दाखवतात.सजग आणि संवेदनशील मनाने मधु नेने हे गेली ५० वर्षे साहित्य निर्मिती आणि व्याख्यानाच्या माध्यमातून लोकाना साक्षर करीत आहेत.समर्थ रामदास स्वामी यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक कसे आहेत हे त्यांनी त्यांच्या लिखाणातून त्रैमासिकातून जगभर पोहचविले आहे.
मधू नेने यांनी आपल्या सत्काराच्या उत्तराच्या भाषणामध्ये सातारकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पत्रकारिता,बँकिंग आणि सहकारी चळवळ या सर्व क्षेत्रांमध्ये वावरत असताना अनेक माणसे जोडली गेली असे त्यांनी नमूद केले.सज्जनगड मासिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याच्या निमित्ताने समर्थ रामदास स्वामींचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता आले याचा मला आनंद वाटतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सज्जनगड मासिक पत्रिकेच्या व्यवस्थापनातर्फेही मधू नेने यांचा सत्कार करण्यात आला.साधना ट्रस्टतर्फे डॉक्टर वसंत शिंदे यांनीही मधू नेने यांचा सत्कार केला तर डॉक्टर मोहन सुखटणकर यांनी आपली यौवनस्पर्श ही दोन पुस्तके सुनीलकुमार लवटे आणि मधू नेने यांना भेट दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद फडके यांनी केले श्रीराम नानल यांनी आभार मानले.
