- कवी, लेखक श्रीकांत देशमुख यांना ‘सातारा प्राईड’ पुरस्कार उद्योजक वसंतशेठ जोशी यांच्या हस्ते प्रदान
सातारा प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी हॉटेल सद्गुरु सातारा येथे सायंकाळी ठीक 8 वाजता सातारा न्यूज मीडिया वतीने दिला जाणारा सातारा प्राईड पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार सातारा येथील प्रसिद्ध कवी, लेखक, समाजसेवक श्रीकांत देशमुख यांना ‘सातारा प्राईड ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ सुनीता देशमुख यांची उपस्थिती होती.श्रीकांत देशमुख सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे प्रसिद्धी प्रमुख या पदावर कार्यरत असून. नुकताच त्यांचा दोन शब्द दोन गोष्टी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मॅनेजमेंट आणि मोटिवेशन या विषयावर त्यांचे पुस्तक वाचकांच्या भेटीस लवकर येणार आहे.
सातारा उपनगरातील खिंडवाडी येथील सरपंच म्हणून ही श्रीकांत देशमुख यांनी विशेष सामाजिक योगदान दिले असून ज्येष्ठ नागरिक संघटनेत त्यांचे विशेष कार्य आहे. उद्योग व्यवसायात ही त्यांचा विशेष कल असून अखंड ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरुणांना उद्योजकतेकडे वळा हा त्यांचा संदेश असतो.
पुरस्कार वितरण समारंभास प्राथमिक शिक्षक बँक अध्यक्ष किरण यादव साहेब, चंद्रविलास उद्योग समूहाचे प्रमुख वसंतशेठ जोशी, उद्योजक बाळासाहेब जगदाळे, उद्योजक सागर भोसले, उद्योजक संतोष जाधव, श्रीरंग काटेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार जयंत लंगडे यांनी केले. तर अली मुजावर यांनी आभार मानले.