सातारा वन विभाग सतर्क – रोहोट परिसरात गावोगावी बैठका, संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना
सातारा प्रतिनिधी –संपूर्ण महाराष्ट्रासोबतच सातारा जिल्ह्यातही मानव व वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर बनली असून, बिबट्यांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सातारा वनपरिक्षेत्रातील रोहोट परिमंडळात वन विभागाकडून संघर्ष कमी करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
रोहोट, खडगाव, धावली तसेच परळी खोऱ्यात वन विभागाचे पथक रात्र गस्त वाढवून सतत गावे, शेतमार्ग आणि जंगल परिसराची पाहणी करत आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी गावोगावी बैठका घेण्यात येत असून नागरिकांना बिबट्यांच्या वावराबाबत आवश्यक माहिती, खबरदारीचे उपाय आणि तात्काळ कळविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे – समाधानाचे वातावरण
पीक नुकसानी व पशुहानी झाल्यास वन विभागाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे काम सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परळी खोरे — दाट जंगल क्षेत्र, जनजागृतीला वेग
दाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी खोऱ्यात वनपाल राजाराम काशीद हे स्वतः ग्रामस्थांना भेटून जागृती करत आहेत.
शेतात काम करताना सतर्कता
लहान मुलांना रात्री एकटे न सोडण्याच्या सूचना
रात्री समूहाने फिरण्याचे आवाहन
बिबट दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळविणे
अशा विविध उपायांद्वारे ग्रामस्थांची जागरूकता वाढवली जात आहे.
वन कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
रोहोट परिमंडळातील वनरक्षक प्रकाश शिंदे, तुषार लगड, जयंत निकम हे संघर्ष कमी करण्यासाठी सातत्याने गावोगावी जाऊन पाहणी करत आहेत. मानव–वन्यजीव संघर्षाचा धोका कमी करण्यासाठी हे पथक दिवस–रात्र कार्यरत आहे.
ग्रामस्थ बैठकीत अधिकाऱ्यांची उपस्थिती
मानव–वन्यजीव संघर्ष नियंत्रणासाठी झालेल्या बैठकीत संदीप जोपळे – वनपरिक्षेत्राधिकारी, सातारा राजाराम काशीद – वनपाल, रोहोट,मुकेश राउळकर – वनरक्षक, सातारा राजाराम पवार – वनसेवक अक्षय भिकू दनाने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रोहोट परिमंडळात जनजागृती, रात्र गस्त, तात्काळ पंचनामे आणि सततची संवाद बैठकांमुळे मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दिशेने सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.




