सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. चुरशीच्या या लढतीत भाजपाचे विकासाचे व्हिजन मतदारांनी स्वीकारत विजय मिळवून दिला. हा विजय वाई शहराच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असल्याचे प्रतिपादन मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
वाई नगरपरिषद निवडणुकीत विजयी ठरलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच त्यांच्या सहकारी नगरसेवकांचे मंत्री गोरे यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत दिलेल्या विकासाच्या वचनांवर विश्वास ठेवून मतदारांनी विजयाचा नवा इतिहास रचल्याबद्दल त्यांनी वाईतील मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानले.
“नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात द्या, मी विजयी सभेला येतो,” असे मी म्हटले होते आणि आज त्या विजयी सभेला उपस्थित राहिलो आहे. वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आग्रही राहणार आहे,” असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
संथ वाहणाऱ्या कृष्णामाईची सेवा करणे, शहरासाठी क्रीडांगण उभारणे तसेच वाई नगरपरिषदेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देणे ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. पुढील वेळी मतांची मागणी करण्यासाठी येईन, तेव्हा ही सर्व कामे पूर्ण झालेली असतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या विजयोत्सव सभेला ज्येष्ठ नेते व माजी आमदार मदनदादा भोसले, सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सुरभीताई भोसले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी भाजप तालुकाध्यक्ष दीपक ननवरे, शशिकांतदादा पिसाळ, नंदकुमार खामकर, विजय ढेकणे, नवनिर्वाचित नगरसेविका केतकी विजय पाटणे, पद्मा पाडळे, प्रसाद बनकर, नवनिर्वाचित नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते तसेच वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



