Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्हा बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

सातारा जिल्हा बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

सातारा जिल्हा बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !

जिल्हयातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार दि ०६/०९/२०२४ रोजी खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली .

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर सभेत समाजाशी, सहकार चळवळीशी, या बँकेशी बांधिलकी असणा-या, निधन पावलेल्या मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक/माजी सेवक, तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूरजवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बँक खातेदार, बँकेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने २ मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली .   

बँकेचे अध्यक्ष मा .खा .श्री .नितीन पाटील यांनी बँकेच्या अहवाल सालातील प्रगतीचा, कार्याचा चौफेर आलेख सभेसमोर विषद केला. यामध्ये प्रामुख्याने बँक, शेतकरी सभासद, सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्यान्वित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, सामाजिक बांधिलकी म्हणून राबवित असलेल्या विविध योजना, कृषि व ग्रामीण विकास योजना इ . चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली. मा .अध्यक्ष यांचे अध्यक्षीय भाषणानंतर सभेचे कामकाज रीतसर पार पडले .

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .बँकेची वैशिष्टयपूर्ण कार्यप्रणाली, बँकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल सभासदांनी बँकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

विकास संस्थांचे सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी प्रश्न सभेत मांडले .तसेच काही सूचनाही केल्या. सभासदांनी केलेल्या सुचनाबाबत विचार केला जाईल .तसेच अडीअडचणी, बँकेच्या नवनवीन योजनासंदर्भात असलेल्या अडचणी, प्रश्न सोडवणूकीचे दृष्टीने बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही मा .अध्यक्ष यांनी दिली. तसेच मा .मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे/शंकांचे निरसन केले .

महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे माजी सभापती मा .आ .श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, दिनांक १५ ऑगस्ट १९४९ रोजी बँकेची स्थापना झाली. बँकेने दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करून ७५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर या नेत्यांनी या बँकेची स्थापना केली. लहानसे रोपटे असलेल्या बँकेचा मोठा वटवृक्ष झालेला आहे . बँकेची चांगली आर्थिक शिस्त, संचालक मंडळाची चांगली ध्येय धोरणे व प्रशासकीय कामकाज या सर्व बाबतीत बँकेचे कामकाज चांगले आहे . आदर्श जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून बँकेने देशामध्ये नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील सहकार क्षेत्रातील इतर बँका आपल्या बँकेचे कामकाज पाहण्यासाठी येतात . आपल्या बँकेच्या वसुली व एन .पी .ए .कामकाजाची माहिती घेतात. बँकेची आर्थिक प्रगती करणे ही संचालकांची जबाबदारी आहे, तेवढीच विकास संस्था व सामान्य शेतकरी सभासद यांची सुध्दा आहे . ही परंपरा आपण जपली पाहिजे . कर्जाची परतफेड करणे ही आपल्या जिल्हयाची संस्कृती आहे, ती जपली पाहिजे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण करणेचा निर्णय घेतला असून सदर काम युध्द पातळीवर सुरु आहे . यामुळे शेतकरी सभासदांना व बँकांना चांगला फायदा होणार आहे .बँकिंग रेग्युलेशन(अमेंडमेंट) अॅक्ट २०२० मध्ये सुधारणा केलेमुळे सहकारी बँकांनी चांगले कामकाज करणे गरजेचे आहे .सहकारी बँकांनी राष्ट्रीयकृत, व्यापारी/खाजगी बँकांप्रमाणे गुणात्मक कामकाज करुन ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा देणे आवश्यक आहे . सहकारी बँकांतील कर्मचा-यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे . 

मा .आ .श्री .बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने मागील वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून अमृतमहोत्सवी वर्ष बँकेने पूर्ण केले आहे. बँकेच्या कामकाजासंदर्भात सभेत काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केलेले असून त्या प्रश्नांचा बँकेचे संचालक मंडळ निश्चित विचार करील. स्व .यशवंतराव चव्हाण यांनी या बँकेची स्थापना जिल्हयातील सामान्य शेतकरी सभासदांची प्रगती व्हावी, न्याय मिळावा म्हणून केली. जिल्हयातील सामान्य घटकाना बँकेच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे . बँकेची कर्ज वसुली चांगली होत असते . त्यामुळे शेतकरी सभासदांना पुरेसे कर्ज वाटप झाले पाहिजे . शासनाच्या विविध अनुदान योजना असून त्यांचा जिल्हयातील शेतकरी सभासद/सुशिक्षित बेरोजगार तरुणांना झाला पाहिजे . महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेचे काही शेतक-यांना पैसे मिळालेले नाहीत ते लवकरच मिळतील. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत होत असते त्यामुळे विकास संस्थांच्या सभासदांना सर्वात जास्त लाभ मिळत असतो . 

याप्रसंगी आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, बाळासाहेब देसाई, किसन वीर इत्यादि थोर नेत्यांनी या बँकेची स्थापना केली व त्यांच्या पुरोगामी विचार व योगदानातून या बँकेची जडणघडण झाली आहे .त्यामुळे बँकेचा राज्यातच नव्हेतर देशभरात नावलौकिक झालेला आहे . या थोर नेत्यांचे पाठबळ सुरुवातीपासून बँकेला लाभले असलेमुळे बँकेला चांगली आर्थिक शिस्त लाभली आहे .

 बँकेचे अध्यक्ष मा श्री .नितीन पाटील यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झालेबद्दल बँकेचे संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवर व सभासद यांचे उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला . 

 जिल्हयातील उत्कृष्ठ कामकाज करणा-या विकास संस्थांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले .

 सभेस बँकेचे संचालक आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्री .प्रभाकर घार्गे, श्री .दत्तात्रय ढमाळ, श्री .राजेंद्र राजपुरे, श्री .प्रदिप विधाते, श्री .सत्यजित पाटणकर, श्री .रामराव लेंभे, श्री .सुनिल खत्री, श्री. ज्ञानदेव रांजणे, श्री. शेखर गोरे, श्री .सुरेश सावंत, श्री .लहुराज जाधव, सौ .कांचन साळुंखे, सौ .ऋतुजा पाटील,सेवक संचालक श्री .जितेंद्र चौधरी, श्री. संग्रामसिंह जाधव, बँकेचे कर सल्लागार श्री. तानाजीराव जाधव, वैधानिक लेखापरीक्षक मे. गोगटे आणि कंपनीचे पार्टनर श्री. स्वानंद देव, सतत व समवर्ती लेखापरीक्षक श्रीमती रेणु घाटगे, श्री. नागेश साळुंखे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, व्यवस्थापक, अधिकारी व सेवक तसेच वि .का .स .सेवा सोसायटया, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, अर्बन बँका, सहकारी पतसंस्था व ग्राहक संस्था, मजूर सोसायटया, पाणीपुरवठा संस्था इत्यादि सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी तसेच व्यक्ती सभासद उपस्थित होते.

याप्रसंगी नूतन जिल्हा उपनिबंधक श्री.संजयकुमार सुद्रिक यांचा संचालक मंडळाचे वतीने यथोचित सत्कार करणेत आला. बँकेचे उपाध्यक्ष मा .श्री .अनिल देसाई यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले व सभा संपलेचे जाहीर केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना सातारा : बांधकाम व बिनशेती प्रकरण देणे जलद गतीने होणेसाठी शासनाने ऑनलाईन

Live Cricket