सातारा बस स्थानक ते यशोदा टेक्निकल कॅम्पस दरम्यान एस. टी. बस सेवा सुरु – विद्यार्थ्यांना दिलासा
सातारा : विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ पासून सातारा बस स्थानक ते यशोदा टेक्निकल कॅम्पस दरम्यान नव्या बस सेवेला शुभारंभ करण्यात आला. या सेवेमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना सातारा शहरापर्यंत आणि शहरातून कॅम्पस पर्यंत नियमित, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससुविधा उपलब्ध होणार आहे.
सकाळी ९.३५ वाजता सातारा बस स्थानकातून ही बस मार्गस्थ झाली आणि ९.५० वाजता यशोदा कॅम्पस येथे पोहोचली. आजच्या पहिल्या फेरीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे व उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी कॅम्पसचे कुलसचिव, विविध विद्याशाखांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आज पहिल्या बस फेरीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील कॅम्पस मध्ये स्वागत करण्यात आले.
शहरातील विविध भागातून यशोदा कॅम्पसला पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यांना वेळ, खर्च व सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन यशोदा ग्रुपच्या पुढाकाराने एस. टी. महामंडळाशी समन्वय साधून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या बस सेवेचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित न राहता परिसरातील सर्वसामान्य प्रवाशांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा दररोज नियमितपणे उपलब्ध राहणार असून यामध्ये भविष्यात आवश्यकतेनुसार फेरबदल किंवा वाढ करण्यात येणार आहे.
यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे , “आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, वेळेची आणि प्रवासाच्या सुलभतेची आम्ही नेहमीच काळजी घेतो. ही बस सेवा ही त्या दिशेने घेतलेले एक सकारात्मक पाऊल आहे.”
पहिल्या फेरीसाठी आलेल्या बसचे पूजन चालक वाहक यांच्यासोबत सातारा बस डेपो चे अधीक्षक राहुल शिंगाडे, राजेंद्र बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेकांनी यामुळे आता वेळेवर कॅम्पसला पोहोचता येणार असल्याचे समाधान व्यक्त केले. या बस सेवेच्या शुभारंभाने यशोदा कॅम्पससाठी एक नवा अध्याय सुरू झाला असून, संस्थेच्या विद्यार्थी केंद्रित धोरणांची ही आणखी एक प्रभावी पावले म्हणून नोंद घेतली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. यशोदा कॅम्पसला साताऱ्याशी जोडणारी ही बस सेवा म्हणजे संस्थेच्या विद्यार्थीनिर्देशित दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. या सेवेचा उपयोग विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही होईल, याचा आनंद आहे. वेळेवर, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास ही आमची प्राथमिकता आहे. पुढील काळात अशा उपक्रमांची व्याप्ती अधिक वाढवणार आहोत.
अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे
