एकाच पक्षाच्या नगराध्यक्षांसह सर्व २६ जागा बिनविरोध
एकाच पक्षाचे नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचा ऐतिहासिक मान मिळालेल्या दोंडाईचा (ता. शिंदखेडा) नगरपालिकेत आज मंगळवार (दि. ३०) विधीवत पदग्रहण सोहळा पार पडला.
बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांच्यासह सर्व २६ नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभागृहात औपचारिकरीत्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यातच नव्हे, तर देशात प्रथमच अशी बिनविरोध निवडणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सोहळ्याला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, लोकनेते सरकारसाहेब रावल, मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रादेवी रावल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल आणि नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत नगरपालिकेत भव्य प्रवेश करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली होती. संपूर्ण पालिका इमारत फुलांनी सजविण्यात आली होती.
अध्यक्षांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवर रावल यांना खुर्चीवर विराजमान करून पदभार स्वीकारण्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी गटनेते निखिल जाधव, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह मुकेश गणसिंग देवरे, रविना कुकरेजा, सरलाबाई सोनवणे, शेख शिबान अहमद, अक्षय चव्हाण, सुपीयाबी बागवान, कल्पनाबाई नगराळे, शेख नबु पिंजारी, विजय पाटील, भारती मराठे, वैशाली कागणे, सुभाष धनगर, देवयानी रामोळे, चतूर पाटील, नरेंद्र गिरासे, राणी अग्रवाल, वैशाली महाजन, निखिलकुमार जाधव, अपूर्वा चौधरी, जितेंद्र गिरासे, भावना महाले, रविंद्र देशमुख, सरजू भिल, सुवर्णा बागुल, भरतरी ठाकुर, ललिता गिरासे आदी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांचे आभार मानत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असून नागरिकांच्या मूलभूत गरजा केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करत दोंडाईचाला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या ऐतिहासिक बिनविरोध निवडीमुळे दोंडाईचा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विकासासाठी एकसंघ नेतृत्व लाभल्याने रखडलेली कामे गतीने पूर्ण होतील, नव्या विकास प्रकल्पांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आगामी काळात शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ घेऊन दोंडाईचा शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी मिळाल्याची भावना या पदग्रहण सोहळ्यानिमित्त सर्वत्र दिसून आली.




