सांगलीतील ‘इस्लामपूर’ शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर’ शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली. इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती. गेल्या ४०-५० वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासनस्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे; अशी मागणी चार – पाच दशकांपूर्वी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता. याबाबत आता आज सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली आहे.
