सैदापूर गावठाण मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था. जागोजागी मोठमोठे खड्डे. नागरिक त्रस्त
सातारा- सातारा शहरा नजीक वसलेल्या सैदापूर गावठाण हद्दीतील मुख्य रस्त्याची चाळण झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. संबंधित यंत्रणेचे झालेले दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढले असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे रस्त्यात मधोमध पडलेले मोठमोठे खड्डे व त्यामध्ये साचलेले पाणी हे बरेचदा वाहनचालकाच्या लक्षात येत नाही त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत असून त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखल होत असून यामुळे वाहने या मार्गावरून घसरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याचे तातडीने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
सातारा शहराच्या काही अंतरावर असणाऱ्या सैदापूर गावठाण परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वसाहत निर्माण झाली आहे. या परिसरात मूलभूत सुविधाही अद्याप उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मूलभूत सुविधेपासून वंचित असणाऱ्या येथील नागरिकांना न्याय कधी मिळणार या प्रतीक्षेत हे नागरिक आहेत. संबंधित यंत्रणा न्याय देत नसल्याने ते हातबल झाले आहेत. विकास व प्रगतीचा जयघोष करणारे फक्त निवडणुकीपुरतेच दर्शन देतात अशी भावना येथील नागरिकांची झाली आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत संपूर्ण देशभर वाडी वस्ती व ग्रामीण भागात रस्ते विकास उभारणीचे कामे जोमाने सुरू आहेत यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून निधीची उपलब्धता केली जाते. परंतु यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव हे शासनाला सादर करणे आवश्यक असतात. सैदापूर ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतल्यास सैदापूर गावठाण मुख्य रस्त्याची झालेली दयनीय स्थिती दूर होईल.
सैदापूर गावठाण हद्दीमध्ये जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी गौरीशंकर नगर ,भाग्योदय कॉलनी, रयत कॉलनी, गणेश पार्क व अन्य सोसायटी ची वसाहत निर्माण झाली आहे येथील नागरिक या मुख्य रस्त्याचा वापर करत असल्याने त्यांना अनेक समस्येंना सामोरे जावे लागते विशेषतः शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत.
श्रीरंग काटेकर सातारा.
