ठाणे येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या नियोजनाचा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांकडून आढावा
ठाणे येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या नियोजनाबाबत आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. राज्य शासनामार्फत आयोजित केलेली ही कबड्डी स्पर्धा ठाणे येथे २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा ठाणे (पश्चिम) भागातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जवळील मैदानावर होईल. या स्पर्धेत पुरुषांचे १६ व महिलांचे १६ असे एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. खेळाडूंची निवास, भोजन तसेच वाहतुकीची उत्तम व्यवस्था करावी. स्पर्धेच्या ठिकाणी स्वच्छता राखावी, तसेच पार्किंग आदी सुविधाही असावी. महिला खेळाडूंच्या बाबत सुरक्षा, निवासाच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची बक्षिसाची रक्कम वाढविण्यासाठी तातडीने क्रीडा विभागाने प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली.
या बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरतडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
