मानसन्मान राखला तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढणार मा.शंभूराज देसाई साहेब
सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना (शिंदे गट) ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीला आमचे प्राधान्य राहील; मात्र जागावाटपात मानसन्मान राखला गेला नाही, तर शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असा ठाम इशारा पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांनी आज दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मा.शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा घटक म्हणून जागावाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित आहे. जागावाटपात शिवसेनेचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. जर वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. मानसन्मान राखला गेला तर ठीक, अन्यथा शिवसेना स्वबळावर मैदानात उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाबाबत आमची दारे खुली असून, महायुतीत एकत्रित निवडणूक लढविण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मात्र अद्याप भाजपा किंवा राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून एकत्रित निवडणूक लढविण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असेही मा.शंभूराज देसाई साहेब यांनी सांगितले.
पालिका निवडणुकांचा दाखला देताना मा.शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, जर यावेळीही महायुती झाली नाही, तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. कराड नगरपालिका निवडणूक ज्या पद्धतीने शिवसेनेने ताकदीने लढवली, त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवण्यात येतील. त्या वेळी कोणाचाही विचार केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. फलटण नगरपालिका निवडणुकीत काही आडाखे चुकल्याने अपयश आले, हेही त्यांनी स्पष्टपणे मान्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, त्यांच्याकडूनही अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे मा.शंभूराज देसाई साहेब यांनी सांगितले.
या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढवणार असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष निरीक्षक नेमले जाणार आहेत. पक्षाची निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण झाली असून, त्याच अनुषंगाने आज शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय इच्छुकांची माहितीही यावेळी घेण्यात आल्याचे मा.शंभूराज देसाई साहेब यांनी सांगितले.या भूमिकेमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



