अवैध गुटखा विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सातारा :महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू व मावा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही सातारा जिल्ह्यात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यात आले. रक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात संस्थापक सुशीलदादा मोझर यांनी अवैद्य विक्री विरोधात आवाज उठविला होता.
लहान टपऱ्यांपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत गुटखा सहज उपलब्ध असून, विशेषतः शाळा व महाविद्यालय परिसरात तरुण व किशोरवयीन मुलांमध्ये हे व्यसन मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने समाजाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कायदेशीर बंदी असूनही होत असलेली विक्री ही कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दर्शवते, असेही प्रतिष्ठानने म्हटले आहे.
गुटखा व तत्सम अमली पदार्थ हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी घातक असून, याविरोधात रक्षक प्रतिष्ठानने जिल्हाभर जनजागृती व आंदोलनात्मक मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात आले. तसेच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात अमली पदार्थांचे उत्पादन होत असल्याची बाब लाजिरवाणी असून, यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूची विक्री येत्या सात दिवसांत बंद करण्यात यावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अवैध विक्रेत्यांविरोधात आंदोलन करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सातारा जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ माळी दस्तगीर बागवान,अमोल भाऊ तांगडे, सातारा जिल्हा संघटक सुशील भाऊ जाधव, सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ पवार, सातारा तालुका अध्यक्ष सुमित साळुंखे मोहसीन शेख, अक्षय चव्हाण, मंगेश चव्हाण,तन्वीर शेख, गुरुदेव कांबळे, श्रीकांत गडांकुश, बंटी मोरे, अली इनामदार, आरिफ अन्सारी, कृष्णा घाडगे व मावळे उपस्थित होते.




