कास पठार पर्यटन व्यवस्थापनात रोहोट वनपरिमंडळाची उल्लेखनीय कामगिरी; वनपाल राजाराम काशीद यांचा गौरव
सातारा प्रतिनिधी :रोहोट वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पुष्प पठार व आशिया खंडातील सर्वात उंच वजराई–भांबवली धबधबा या प्रमुख पर्यटनस्थळांच्या संवर्धन व पर्यटन विकासासाठी रोहोट वनपरिमंडळाने सन २०२५ च्या पर्यटन हंगामात प्रभावी व नियोजनबद्ध कार्य केले आहे. या संपूर्ण कामकाजाचे नेतृत्व वनपाल राजाराम काशीद यांनी केले.
सन २०२२ पासून रोहोट वनपरिमंडळाचा कार्यभार सांभाळत असताना काशीद यांनी पर्यटन नियोजन, वन महसूल वाढ, कास पठारावरील गर्दीचे नियंत्रण, पार्किंगचे योग्य नियोजन तसेच कास व कासानी पार्किंग परिसरात वाहन व्यवस्थापनावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यावर विशेष भर दिला. पर्यटन हंगामात शनिवारी व रविवारी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करून स्वयंसेवकांच्या सहकार्याने योग्य नियोजन राबवून संपूर्ण हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कास पुष्प पठाराचा पर्यटन हंगाम साधारण दीड ते दोन महिने चालतो. सन २०२५ च्या हंगामात कास पठाराच्या जनजागृती, लोकजागृती, प्रचार व प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच कास पठार अंतर्गत येणाऱ्या सहा गावांशी समन्वय साधत स्थानिक लोकसहभागातून पर्यटन विकासाचे काम सुरू ठेवण्यात आले. पर्यटन हे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारे माध्यम असल्याचे प्रतिपादन काशीद यांनी केले.
कास पठार व वजराई–भांबवली धबधबा या दोन्ही जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांवर आधारित दोन पुस्तके व टिपण्या कास पठारावर तसेच एक पुस्तक व एक टिपणी वजराई धबधब्यावर काशीद यांनी तयार केली असून, ही माहिती त्यांनी तात्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली होती. या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना वनमंत्र्यांकडून प्रशंसापत्र देखील प्राप्त झाले आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांत पीकनुकसान, पशुहानी तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काशीद यांनी विशेष प्रयत्न केले. नियमित रात्रीची गस्त घालून शिकारीला आळा घालण्यात यश मिळाले असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे कामही त्यांनी केले आहे. ग्रामस्थांशी नियमित बैठका घेऊन लोकसहभागातून वनविकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे. यामुळे वन विभागाची प्रतिमा स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक झाली आहे.
दरम्यान, सातारा वनविभाग व कोल्हापूर वनवृत्त अंतर्गत पर्यटन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते राजाराम काशीद (वनपाल, रोहोट) यांचा गौरव करण्यात आला.




