रयत मार्फत दि. ४ ऑक्टोबर रोजी संस्था वर्धापन दिनाचे आयोजन ग्रामीण कवी प्रा. इंद्रजित भालेराव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार
सातारा (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या खेडोपाडयातील बहुजन समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांनी उच्च विद्या विभूषित व्हावे, त्याबरोबरच समता, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्यांच्या आधारे राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावे यासाठी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या असीम त्याग आणि दूरदृष्टीमुळे रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या १५ आणि कर्नाटक राज्याच्या १ अशा एकूण १६ जिल्ह्यात शिक्षणाचे पवित्र कार्य करीत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या कर्मवीर समाधी परिसरात आयोजन करण्यात आलेला आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या १०६ व्या वर्धापन दिन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ ग्रामीण कवी, प्रतिभावंत लेखक आणि वक्ते मा.प्रा. इंद्रजित भालेराव हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कर्मवीर अण्णांच्या समवेत रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी समाजातील ज्या मान्यवरांनी तन-मन-धन संस्थेसाठी देऊन संस्थेच्या शाखा उभारणीमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे अशा मान्यवरांच्या नावाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श शाखा, आदर्श विद्यार्थी, आदर्श प्राचार्य, आदर्श गुरुकुल प्रमुख, आदर्श उपक्रमशील शाळा, आदर्श लाईफ मेंबर, आदर्श लाइफ वर्कर, आदर्श स्वायत्त महाविद्यालय अशा विविध पुरस्कारांनी शाखा व सेवक, विद्यार्थी यांना पारितोषिके देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विविध महाविद्यालयाशी संलग्नित विद्यापीठातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या समारंभासाठी सातारा शहरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.
