Home » Uncategorized » सातारा येथे झालेली संमेलने दिशादर्शक सातारा ग्रंथ महोत्सवामध्ये रंगला परिसंवाद

सातारा येथे झालेली संमेलने दिशादर्शक सातारा ग्रंथ महोत्सवामध्ये रंगला परिसंवाद

सातारा येथे झालेली संमेलने दिशादर्शक सातारा ग्रंथ महोत्सवामध्ये रंगला परिसंवाद

सातारा –सातारा येथे गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या विविध साहित्य संमेलनाच्या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला. सातारा येथे झालेल्या सर्व संमेलनांनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये नवीन पायंडे पाडून एक दिशादर्शक काम केले असे मत सर्वच वक्त्यांनी नोंदवले. 

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीने आयोजित केलेल्या 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्व जिल्हा ग्रंथ महोत्सवामध्ये झालेल्या परिसंवादामध्ये सर्वच मान्यवरांनी सातारा येथे झालेल्या संमेलनाच्या आठवणी सांगितल्या.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजीराव पाटणे होते.

परिसंवादाची सुरुवात करताना ज्येष्ठ लेखक शाम भुरके यांनी सातारा शहरामध्ये न्यु इंग्लिश स्कुलमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आचार्य प्र के अत्रे व इतर साहित्यिकांचा सहवास कसा लाभला याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

 ऍड. सीमंतिनी नुलकर यांनी सातारा येथे झालेल्या 1993 च्या साहित्य संमेलनाच्या आठवणी जागवताना त्या संमेलनामध्ये गाजलेल्या चिमणगाणी या बाल कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख केला आणि एक श्रोता म्हणून या संमेलनाने खूप चांगला आनंद दिला असे मत नोंदवले.

 १९६२ आणि १९९३ च्या संमेलनाच्या आठवणी सांगत सुहास बोकील यांनी आचार्य अत्रे यांच्या आठवणींना उजाळा देताना अत्रे यांच्या एका भाषणाचा ऑडिओ ऐकवून श्रोत्यांना वेगळा आनंद दिला.

परिसंवादाचे प्रमुख आकर्षण असलेल्या जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी 1993 येथे झालेल्या सातारच्या संमेलनाने मला एक वेगळी उंची दिली आणि त्याचा फायदा मला आगामी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला असे सांगितले. सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाने किती नवीन गोष्टी साहित्य क्षेत्राला दिल्या याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. विंदा करंदीकर यांच्यासारख्या जेष्ठ कवीची उपस्थिती या संमेलनाला होती हे वेगळेपण होते असेही त्यांनी सांगितले. सातारा येथील साहित्य संमेलनामध्ये मी जी कविता म्हटली होती त्यामुळे महाराष्ट्रात एक कवी म्हणून माझा पाया मजबूत झाला याची कबुली त्यांनी दिली.

 ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी एक पत्रकार या नात्याने 1993 येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा आढावा घेतला.संमेलनाच्या कालावधीमध्ये साहित्यिक तुमच्या घरी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला होता आणि लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमांमध्ये सुद्धा लेखक आणि वाचक यांचा संवाद चांगला रंगला होता अशी आठवण त्यांनी सांगितली. रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेले हे एकमेव साहित्य संमेलन होते असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी सातारच्या संमेलनांनी साहित्य क्षेत्राला काय दिले ते सांगितले. सातारा संमेलनाने नेहमीच दिशादर्शक म्हणून काम केले आहे आणि आगामी संमेलनाबाबतही तशीच अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक संभाजीराव पाटणे यांनी सातारा येथे झालेले 1993 चे संमेलन हे सर्वसाधारण कार्यकर्ते आणि साहित्य रसिक यांच्यामुळे यशस्वी झाले असे स्पष्ट केले त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे आणि साध्या कार्यपद्धतीमुळे हे संमेलन कायमच लक्षात राहिले असे ते म्हणाले.

परिसवादाचे सूत्रसंचालन शिरिष चिटणीस यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये 1993 च्या सातारा साहित्य संमेलना मिळालेला प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता की त्यानंतर कधीही इतका प्रतिसाद कोणत्याही साहित्य संमेलनाला मिळाला नाही असे स्पष्ट केले. अनेक वेळा परिसंवाद इतके रंगायचे की नंतरचे कार्यक्रम पुढे ढकलावे लागायचे अशी आठवण त्यांनी सांगितली.सर्व कार्यकर्त्यांनी निस्पृहपणे आणि गंभीरपणे काम केल्यामुळे 1993 चे साहित्य संमेलन एक मैलाचा दगड ठरले असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा यशवंत पाटणे, प्रदीप कांबळे,राजकुमार निकम, पुण्याच्या उत्कर्ष प्रकाशनाचे सु वा जोशी आणि मान्यवर उपस्थित होते.परिसंवादाला साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 21 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket