रामोशी, बेडर आणि बेरड समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा 234 वा शासकीय जयंती सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
आपल्या रामोशी, बेडर, आणि बेरड समाज या समाजाचा इतिहास, अतिशय स्वर्णीम अशा प्रकारचा इतिहास आहे. संस्कृती आणि निसर्गाचे संवर्धन करणारा, देव, देश, धर्मा करिता लढणारा, दऱ्या खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या या समाजाचे नाते प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांशी आपल्याला पाहायला मिळते.
स्वराज्य निर्मितीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी मोलाचं योगदान दिले, त्यातले प्रमुख हे शूरवीर बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवरायांचे अतिशय विश्वासू होते. त्यांच्या गुप्तहेरगिरीमुळे लाखोंच्या सैन्यापुढे छत्रपती शिवराय गनिमी काव्याने जिंकत होते. अनेक रामोशी समाजाच्या किल्लेदारांनी प्राणपणाने स्वराज्याच्या किल्ल्यांचे रक्षण केले, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात पहिली संघर्षाची ठिणगी राजे उमाजी नाईक यांनी पेटवली. गरिबांवर अन्याय होणार नाही, यासाठी राजे उमाजी नाईक यांनी आज्ञापत्र काढले. रामोशी, बेडर, बेरड समाज घाबरावा म्हणून, राजे उमाजी नाईकांना जाहीर फाशी इंग्रजांनी दिली. पण समाज स्वातंत्र लढ्यात मागे राहिला नाही.
समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. समाजाने हाक दिली आणि शासन त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या तरुण आणि तरुणींना ₹2 लाखापर्यंतच्या कर्जाकरिता कोणतेही तारण नाही तसेच समाजाच्या तरुणाईला उद्योग व्यवसायासाठी ₹15 लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरापगड जातींना मुख्य धारेमध्ये आणणार नाही, तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि हे शिवकार्य पूर्ण केल्याशिवाय महायुती सरकार थांबणार नाही. समाजाच्या मागण्या आम्ही नक्की पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजय शिवतारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
