राज्यघटनेने देशाला एका रूपात जोडले अमित कुलकर्णी; हिंदवी स्कूलमध्ये राज्यघटना दिनानिमित्त कार्यक्रम
सातारा- प्रत्येक भारतीय नागरिकासाठी २६ नोव्हेंबर हा ‘भारतीय राज्यघटना दिन’ अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश राज्य घटनेशिवाय चालू शकत नाही. या राज्यघटनेमुळेच विविध धर्म आणि जातींच्या भारताच्या १४० कोटी लोकसंख्येला एका देशाच्या रूपात जोडते. राज्यघटनेत देशाची तत्त्वे आणि ते चालवण्याचे मार्ग असतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांनी केले.
शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये राज्यघटना दिनानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गुरुकुलच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, गुरुकुल प्रमुख संदीप जाधव आदी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘ही राज्यघटनाच आहे जी आपल्याला एका स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र नागरिकाची भावना जाणवून देते. जिथे राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आपली ढाल बनून आपल्याला आपला हक्क मिळवून देतात, तिथेच राज्यघटनेत दिलेले मूलभूत कर्तव्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांचीही आठवण करून देतात. या राज्यघटनेदिनी आपण आयुष्यभर आपल्या मूलभूत कर्तव्यांचे आणि देशाच्या कायद्याचे पालन करण्याचा प्रण घेतला पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने केवळ राज्यघटनेचा उद्देश पूर्ण होणार नाही, तर राज्यघटना निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्राची निर्मिती होईल.’
अन्वया जाधव या विद्यार्थिनीने प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी राज्यघटनेवर आधारित नाटिका सादर केली. श्रेयस खटमल या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत त्यांचे मनोगत व्यक्त केले. श्रुती बोधे हिने आभार मानले.




