प्रेरणा संवादच्या शिवजयंती दशकपूर्ती निमित्त निश्चयी चारित्र्य पुस्तकाचे झाले दिमाखात प्रकाशन
वाई प्रतिनिधी -१९ फेब्रुवारी म्हटलं की प्रेरणा संवादच्या बालमित्र मैत्रिणींनीसाठी हा दिवस नवपर्वणीच असतो. १९ फेब्रुवारी संपला असली तरी पुढील वर्षी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याची आतुरतेने वाट पाहणारी ही चिमुकले आणखी नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या किल्याची वाट सर करण्यासाठी आयोजनाची वाट पाहत असतात.
शेकडो डोक्यावर परिधान केलेली पांढरी टोपी आणि त्यावर उमटलेले भगवे झेंडे, छातीवर लटकलेले ओळखपत्र आणि मुखातून बाहेर पडणारी शिवगर्जना देत संयोजकांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे काल १९ फेब्रुवारी बुधवार रोजी प्रेरणा संवाद टिमने पुणे जिल्ह्यातील, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्यावर जाऊन शिवजयंती उत्सव साजरा केला.
सकाळी प्रथमतः पाचवड ता. वाई येथे रायरेश्वरला मार्गस्थ होण्याअगोदर प्रवासी वाहनांचे विधिवत पूजन श्री सोनावणे आप्पा यांचे हस्ते करण्यात आले.भौगोलिक दृष्ट्या सोपी चढाई असणाऱ्या गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून १३३७ मीटर उंचीवर आहे, रायरेश्वर आपल्या विविध गुणांनी ओळख जपणारा, राखणारा असला तरी यातील मुख्य वेगळेपण म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, तसेच सप्तरंगी असणारी माती.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याची उंचीच अर्थपूर्ण
निश्चयी चारित्र्य हे पुस्तक प्रकाशन सोहळा हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला, योगायोग म्हणजे प्रेरणा संवादच्या शिवजयंती किल्ले मोहिमेला यावर्षीचे दहावे वर्ष होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायरेश्वर किल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन जो निश्चय केला त्या पवित्र ठिकाणी लेखक राहुल नकाते सर, प्रकाशक डाॅ श्री मोहन सोणावणे सर, मुखपृष्ठ अजिंक्य जाधव, चित्रे संतोष दिवटे, अक्षरजुळणी नितिन सोनावणे यांच्या लिखित पुस्तकाचे प्रकाशनाचा उद्देश म्हणजेच
_निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू ।_
_अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।_
_यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।_
_पुण्यवंत नितीवंत । जाणता राजा |_
राजांचे कार्य हे अलौकिक तर आहेच आणि त्यांच्या कार्यातील नेमके गुण समजून घेऊन ते नित्य दूरदृष्टी जीवनात आमलात आणण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाला आणि उद्याच सुंदर भविष्य ज्यांच्या हातात आहे त्या सर्वांसाठी इतिहासाची पाने अलगद समोर यावीत आणि ती तितकीच आत्मीयतेने त्यांना समजून जातील म्हणून लेखक श्री राहुल नकाते सर यांनी “निश्चयी चारित्र्य” या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मांडला आहे.बालमित्रांनी सादर केललेले पोवाडे, शिवगर्जना, हस्तचित्रकला ही तर शिवजयंती उत्सवाला दिलेली विशेष उंची आहे.
प्रेरणा संवादचा उद्देश
प्रेरणा संवाद हा एक विचार आहे आणि तो निर्मळ मन, स्वच्छ बुद्धी आणि कधी न कमी होणाऱ्या कार्यशक्तीला बळकटी देण्यासाठी दरवर्षी नवीन किल्ल्याची आणि परिसराची निवड करून बालमित्र मैत्रिणी यांना सोबत घेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची ओळख करून देण्याचे काम करून एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्याचा उदात्त हेतूला आता अखंडित १० वर्षे पूर्ण झाली आहेत.या शिवजयंती उत्सवा निमित्त व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर जिल्हयातील प्रेरणा संवाद बालमित्रमैत्रिणी, पालक तसेच छावा ग्रुप, पत्रकार, संपूर्ण नकाते कुटुंबिय आणि त्यांचे नातलग, जिवलग तसेच चिंधवली शिक्षकवर्ग टिम, तसेच संयोजन सहकारी उपस्थित होते.सामाजिक जाणीवेतून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणारे, राबणारे आणि सेवा देणारे हात लाखमोलाचे होते.सूक्ष्म नियोजन करण्यासाठी संयोजकांनी केलेली आखणी आणि त्याची वेळेत कार्यवाही करून केलेली अंमलबजावणी यामुळे प्रेरणा संवादची किल्ले दर्शन शिवजयंती उत्साहात पार पडली.
