महिलांचा सहभाग हाच ग्रामविकासाचा पासवर्ड
कराड -प्रतिनिधी” ग्रामपंचायतीत पाच वर्षांसाठी विश्वस्त म्हणून मिळालेल्या संधीतून सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिकार,कर्तव्य, जबाबदारी ओळखून कामे करा. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो, ती कामे यशस्वी होतात. क्रांतीज्योती प्रशिक्षणातून अधिक सक्षम होऊन ग्रामविकासचा पाया म्हणजे महिलांचा सहभाग हाच पासवर्ड असल्याचे सिध्द करू या,”असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सातारा जिल्हा परिषद,कराड पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे वर्ये-सातारा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सरपंच, सदस्यांचे क्रांतीज्योती प्रशिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज येथे आयोजित करण्यात आले आहे.दि.१३ ते १५ फेब्रुवारी कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून त्याचे उद् घाटन कराड पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी विजय विभूते, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे रजिस्टार डॉ.अरुण सकटे यांच्या हस्ते आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, प्रविण प्रशिक्षिका संगिता वेंदे, सुवर्णा देशमुख,शारदा पवार आणि विविध गावच्या सरपंच यांच्या उपस्थित झाले.
डॉ.अरुण सकटे यांनी “गावाने नेतृत्व कौशल्य ओळखून तुम्हाला ग्रामपंचायतीत सरपंच,सदस्य म्हणून निवडून दिले. आता तुम्हाला असलेले अधिकार, कर्तव्य,जबाबदारी कामे यांची प्रशिक्षणातून माहिती मिळणार आहे.गावाच्या विकासात्मक गरजा ओळखून तुम्ही सर्वोत्तम योगदान द्यावे.महिला सरपंच,सदस्या या अधिक सक्षमपणे आदर्श कार्य करु शकतात,असा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य विजय जाधव यांनी क्रांतीज्योती प्रशिक्षणाची महती विषद केली.
यावेळी कराड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच, सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.