पार गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा -सेहुल ढेबेची भारतीय सैन्य दलात निवड
महाबळेश्वर (प्रतिनिधी)महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरदऱ्यात वसलेल्या पार गावातील सेहुल बाळू ढेबे याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्याचे कौतुक होत असून, “सेहुलची निवड गावासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भिकू दादा सोंडकर यांनी केले आहे.
जिद्द आणि चिकाटीचे फळ
भारतीय सैन्य दलातर्फे नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. सेहुल गेल्या अनेक दिवसांपासून या भरतीसाठी कठोर परिश्रम घेत होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, डोंगररांगांमध्ये सराव करून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या निवडीमुळे महाबळेश्वरच्या पश्चिम भागातील आणि विशेषतः दुर्गम भागातील तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांतर्फे जंगी सत्कार
सेहुलच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामवरदायिनी मंदिरात विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण गाव जणू उत्साहात न्हाऊन निघाले होते. गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले, तर तरुणांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेहुलला देशाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “दुर्गम भागातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, फक्त त्यांना योग्य संधीची गरज आहे. सेहुलने ते सिद्ध करून दाखवले,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या सत्कार समारंभास भिकू दादा सोंडकर यांच्यासह सुभाष महादेव सोंडकर,संजय मोरे,सुभाष शंकरराव सोंडकर,दिपक सोंङकर,संजय सोंङकर,नितीन सोंङकर(पो.पाटील),प्रभाकर सोंङकर,सुनिल सोंङकर,संतोष ढेबे, राजाराम ढेबे, ढेबे कुटुंबीय यांच्यासह गावातील आबालवृद्ध, मोठ्या संख्येने महिला आणि तरुण वर्ग उपस्थित होता. सेहुलच्या या यशामुळे पार गावाचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर अभिमानाने कोरले गेले आहे.



