पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या माध्यमातून दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन
महाबळेश्वर: शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीने सोमवार,दिनांक 24 फेब्रुवारी व मंगळवार,दिनांक 25 फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती महाबळेश्वरच्या प्रांगणात करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या या नाविन्यपूर्ण महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. दुर्गम अशा महाबळेश्वर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये समन्वय साधून शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कलागुणांना तालुकास्तरावर मोठे व्यासपीठ मिळवून देणे.स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा यथोचित गौरव करणे. शाळांच्या विकासामध्ये समाजाचा उत्तम सहभाग मिळवणे. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाज यांच्यामध्ये शिक्षण विषयक जनजागृती करून शैक्षणिक चळवळ उभी करणे ,अशा विविध उद्दिष्टाना समोर ठेवून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.
दोन दिवसीय शिक्षण महोत्सवात दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.सोमवार ,२४फेब्रुवारी ग्रंथदिंडी व शैक्षणिक चित्ररथाच्या माध्यमातून शिक्षण महोत्सवाची सुरुवात होईल.पंचायत समिती, बाजारपेठ, पोलीस स्टेशन, छ. शिवाजी महाराज चौक,अहिल्यादेवी चौक, पंचायत समिती या मार्गाने ग्रंथदिंडी संपन्न होईल.सकाळी ठीक अकरा वाजता महोत्सवाचे उद्घाटन, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व यशोगाथा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील,खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,शिक्षण उपसंचालक महेश चोथे,शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, गटविकास अधिकारी यशवंत भांड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाङमय निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यात तालुक्यातील विद्यार्थी आपल्या स्वनिर्मित साहित्य कृती सादर करणार आहेत.लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून अध्यक्ष भरत सुरसे, प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद पारठे व सुनील शेडगे उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता शिक्षक कवी संमेलन संपन्न होणार आहे. दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते उद्घाटन तर अध्यक्ष म्हणून योगिता राजकर व प्रमुख अतिथी लक्ष्मीकांत रांजणे, तुकाराम धांडे, ज. तु. गार्डे असणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षक व पंचायत समिती कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे…
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार ,दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर यांचे ‘शिक्षकांचे व्यक्तिमत्व घडवताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास डाएट फलटणचे प्राचार्य डॉ. अमोल डोंबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अकरा वाजता शैक्षणिक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नामदेव माळी. सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, माणिक वांगीकर, विज्ञान अभ्यासक वसंत जोशी परिसंवादात सहभागी होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी(योजना)अनिस नायकवडी असणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम दुपारी बारा वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते होईल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. दुपारी तीन वाजता शिक्षण महोत्सवाचा समारोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी,दानशूर व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे, शिक्षण संचालक योजना महेश पालकर, जिल्हा बँक संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य, प्रविण भिलारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर,महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी योगेश पाटील, पाचगणी नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दोन दिवसीय शिक्षण महोत्सवास तालुक्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, अधिकारी, पदाधिकारी, सरपंच यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सव कार्यकारी समिती तसेच गटविकास अधिकारी यशवंत भांड आणि गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले आहे.
