61 व्या वाढदिवसानिमित्त हरीदादा राजपुरे यांच्या कार्याचा गौरव; कणुरमध्ये जंगी कुस्त्यांचे मैदान
वाई प्रतिनिधी : बावधन-कणुर परिसरात समाजकार्य, कुस्ती परंपरा आणि सर्वांगीण विकासासाठी ओळखले जाणारे हरीदादा राजपुरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या जन्मदिनी कणुर गावी भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान रंगणार असून गावात उत्साहाचे वातावरण आहे.
कणुरचे हरीदादा राजपुरे – समाजकार्य, कुस्ती परंपरा आणि विकासाची वाटचाल उजळवणारे व्यक्तिमत्त्व
बावधन परिसरातील सर्वार्थाने आदर्श नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे हरीदादा राजपुरे यांचा 23 नोव्हेंबर 1964 रोजी जन्म झाला. लहानपणापासूनच घरातील कुस्ती परंपरेत वाढलेल्या हरीदादांनी प्राथमिक शिक्षण कणुर व 7 वी ते 10 वी शिक्षण बावधन हायस्कूलमध्ये पूर्ण केले. कुस्तीचे धडे घरातून शिकत त्यांनी पुढे शेतकरी जीवन जगत असतानाच कुस्तीक्षेत्रातही उल्लेखनीय नावलौकिक मिळवला.
राजकीय आणि सामाजिक प्रवास
1987 मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या हरीदादांनी सलग पाच वर्षे उपसरपंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर सोसायटीत चेअरमन म्हणून 10 वर्षे व संचालक म्हणून20वर्ष महत्त्वाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. बावधन सोसायटीमध्ये दोन टर्म ते चेअरमन म्हणून कार्यरत राहिले आणि विकासात्मक निर्णयांत मोलाची भूमिका निभावली.
खरेदी-विक्री संघातील दशकभराची सेवा
वाई तालुका खरेदी-विक्री संघात संचालक म्हणून तब्बल दहा वर्षे काम करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे विविध उपक्रम त्यांनी राबवले.
धार्मिक व समाजसेवेतील निष्ठा
1996 पासून काढशिद्धेश्वर महाराजांच्या अध्यात्मिक कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा मंजूरी मिळवून देताना त्यांनी पुढाकार घेत गावाच्या आरोग्यसेवेत भर घातली.
शिक्षण आणि संस्कृतीचा वारसा
मुले-मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबात तसेच समाजात प्रोत्साहन दिले. शाळा व्यवस्थापन समितीसाठी त्यांची सेवा अत्यंत मोलाची ठरली आहे. पारायण मंडळाला नेहमी सर्वतोपरी मदत, तर मठाला तब्बल 30 गुंठे जागा दान देऊन त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.
जंगी कुस्त्यांचा सोहळा – 61व्या वाढदिवसानिमित्त
हरीदादा राजपुरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त कणुर येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले असून परिसरातील सर्व पैलवान आणि ग्रामस्थ यामध्ये उत्साहाने सहभागी होणार आहेत.
हरीदादा राजपुरे हे ग्रामीण विकास, शिक्षण, धर्म आणि क्रीडा क्षेत्रात बहुमोल कार्य करून खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून उभे राहिले आहेत.




