मानसी घोष बनली ‘इंडियन आयडल १५’ ची विनर भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष: नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकाल माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनेलचा सुमारे ८००० मताधिक्याने विजय. जेथे धर्म, तेथे विजय आणि जेथे राम, तेथे सत्य!इतिहासाच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज सुरेश वाडकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे हे उपक्रम प्रेरणादायी आहेत-ज्ञानदेव रांजणे महाबळेश्वर तालुक्यात तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न
Home » राज्य » पर्यटन » ओला-उबरच्या शिरकावामुळे महाबळेश्वरमधील ८०० टॅक्सी व्यावसायिक संकटात, उपासमारीची भीती

ओला-उबरच्या शिरकावामुळे महाबळेश्वरमधील ८०० टॅक्सी व्यावसायिक संकटात, उपासमारीची भीती

ओला-उबरच्या शिरकावामुळे महाबळेश्वरमधील ८०० टॅक्सी व्यावसायिक संकटात, उपासमारीची भीती

महाबळेश्वर- महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये ओला आणि उबरसारख्या ऑनलाईन टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे येथील सुमारे ८०० स्थानिक टॅक्सी आणि टूरिस्ट टॅक्सी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्यटनावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक स्थानिक स्थळांना भेट देण्यासाठी तसेच पुणे-मुंबई विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक टॅक्सी आणि टूरिस्ट टॅक्सींवर अवलंबून असतात. हे भाडेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. मात्र, आता ओला-उबरसारख्या बाहेरील शहरांतील कॉर्पोरेट कंपन्यांनी येथे आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आधीच स्वतःच्या गाड्या घेऊन येणाऱ्या पर्यटकांमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक व्यावसायिकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या ऑनलाईन कंपन्या स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा कमी भाडे आकारत असल्याचा आरोप स्थानिक टॅक्सी चालकांनी केला आहे. शासनाने निश्चित केलेले दर कमी केल्यास तोट्यात व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. तर दुसरीकडे, कमी दरात भाडे मिळत असल्याने पर्यटक ऑनलाईन कंपन्यांना अधिक पसंती देत आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यात अनेकदा भाड्यावरून वाद आणि गैरसमज निर्माण होत आहेत, ज्याचा परिणाम येथील पर्यटनावरही होत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत स्थानिक टॅक्सी चालक आणि टूरिस्ट चालकांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णायक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ओला-उबरसारख्या कंपन्यांची टांगती तलवार नेहमीच त्यांच्या व्यवसायावर मंडराताना दिसत आहे.

यापूर्वी, २०२४ मध्ये महाबळेश्वर नगरपालिकेने एक ठराव पारित करून ओला-उबरसारख्या ऑनलाईन बुकिंग कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. स्थानिक टॅक्सी संघटना आणि टूरिस्ट संघटनांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पालिकेच्या ठरावानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ऑनलाईन कंपन्यांचा महाबळेश्वरमधील व्यवसाय वाढतच आहे.

या पार्श्वभूमीवर, महाबळेश्वरमधील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांचे भविष्य अंधारात आले आहे. शासनाने तातडीने याची दखल घेऊन स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, या ऐतिहासिक पर्यटन स्थळावरील स्थानिक व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket