ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिली माहिती
ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः मध्य भारत, दक्षिणेकडील राज्ये तसेच ईशान्य भारतात पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामानातील बदल व चक्रीवादळांच्या शक्यतेमुळे हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होऊ शकतो. मॉन्सूनच्या माघारीसह ऑक्टोबरमध्ये होणारा हंगामी पाऊस कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जातो.
या अतिरिक्त पावसाचा फायदा खरीप हंगामातील उशिरा पेरणी झालेल्या पिकांना होणार असला तरी, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतमालाच्या नुकसानीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.हवामान खात्याने नागरिकांना सतत अद्ययावत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
