नवनिर्मितीतून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करावे : अनिस नायकवडी
महाबळेश्वर (राजेंद्र सोंडकर )पंचायत समिती महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर शिक्षण महोत्सव 2025 मध्ये महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘अभ्यासक्रमातील बदल समजून घेताना’ या विषयावर शैक्षणिक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या योजना विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नामदेव माळी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, विज्ञानगड संस्थापक शास्त्रज्ञ वसंत जोशी, शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी प्रा.माणिक वांगीकर, महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती..
शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर म्हणजे हा ‘परिसंवाद’ होय. केवळ ‘सांगणे’ म्हणजे शिकवणे नव्हे, मुलांनी स्वतः विचार करावा, चर्चा करावी, अनुभव घ्यावा, कृती करावी, या बाबींना प्राधान्य देणारी रचनावादी पद्धती आणि अभिव्यक्तीचे उपक्रम हाती घेऊन मुलांना बोलते करावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी केले. शिक्षकांप्रमाणेच प्रशासकांनाही कामाचा भरपूर व्याप आहे. त्यातूनही नवनिर्मितीचे चैतन्य असणारे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे हे चेतना करणार निर्माण करणारे गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर तालुक्याला लाभले हे महाबळेश्वरचे वैभवच आहे. असे गौरवोद्गार काढले.
नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा घेत असतानाच कोठारी आयोगापासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या धोरणाचा परामर्श घेत मुलांमध्ये समस्या सोडवण्याची ताकद यावी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ज्ञानरचनावाद किती गरजेचा आहे याचे महत्त्व पटवून दिले. 100% विद्यार्थ्यांना 100% क्षमता प्राप्त व्हाव्या असा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. किमान मूलभूत क्षमतांचा त्यात अंतर्भाव केला असून विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यां शिवाय इतर सर्व मुलं स्वतः शिकू शकतात फक्त त्यांना आपले योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.मानवी संवेदनशीलता आपणास वाढवावी लागेल तरच खऱ्या अर्थाने शिक्षण प्रक्रिया योग्य दिशेने घडेल असे प्रतिपादन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी केले.
विज्ञान अभ्यासक वसंत जोशी सर (विज्ञानगड संस्थापक) यांनी आपले मत मांडताना प्रायोगिक शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांतील अनुभव विश्वातील तफावत दूर करण्यासाठी विज्ञान गड संकल्पना काय आहे याचं विवेचन केलं. साक्षरता म्हणजे फक्त लेखन वाचन नव्हे तर डिजिटल साक्षरता आली पाहिजे. एक्सेप्टेड स्क्रीन टेक्नॉलॉजी रुजणं काळाची गरज आहे .एन .इ. पी 2020 मध्ये प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी देखील शासनाने योजना आखाव्या. त्यातून भारताचे शास्त्रज्ञ ,तंत्रज्ञ निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला.
‘गुरुविण कोण दाखवील वाट’ अशी सुरुवात करत प्रा. माणिक वांगीकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भिलार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत मुलांशी गप्पा मारा, त्यांना बोलतं करा, सुप्त गुणांचा शोध घेऊन आनंददायी जगण्यासाठी चालना द्या. केवळ बौद्धिक क्षमतेवर भर नको. यासाठी घर, परिसर, पालक यांचे सर्वेक्षण करून परिस्थिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांच्या क्षमतेला न्याय देणारं शिक्षण यापुढे दिलं जावं असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिस नायकवाडी शिक्षणाधिकारी (योजना) यांनी समारोप करत असताना शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांतील चांगल्याचा शोध घेणे . विद्यार्थ्यांची बौद्धिक, अनुवंशिक स्थिती वेगळे असते. ते जाणून घेऊन स्वतः अध्यापन न करता मार्गदर्शन करा. सर्व काही विद्यार्थ्यांना करू द्या. कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले जाणार आहे. तेव्हा बदलाला सामोरे जाण्याची तयारी शिक्षकांनी करायलाच हवी.
‘अभ्यासक्रमातील बदल समजून घेताना’ या चर्चासत्र व परिसंवादामध्ये पुरुषोत्तम माने, अमित कारंडे व संजय संकपाळ या शिक्षकांनी शैक्षणिक प्रक्रियेवर प्रश्न विचारत सहभाग घेतला. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी सहभागी सर्व शिक्षण तज्ञांचे चर्चेत सहभाग घेत आभार मानले.
