नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न
नवी मुंबई -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर) पार पडलं आहे. खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात मोदी यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी मुंबई, महाराष्ट्राचा विकास तसेच विकसित भारताची संकल्पना यावरही भाषण केले. नवी मुंबई येथील विमानतळाला आता दि बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या नामकरणासाठी स्थानिकांना मोठा संघर्ष करावा लागला. मोदी यांनी आपल्या भाषणात दि बा पाटील यांचेही नाव घेतले आहे
विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते असं मोदींनी म्हटलं आहे.
“विजया दशमी (दसरा) झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली, आता १० दिवसांनी दिवाळी आली आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळखलं जाईल. तसेच आज मुंबईला भूमिगत मेट्रो मिळाली आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मुंबई सारख्या व्यस्त शहराला जमीनीच्या खाली, ते देखील सर्व इमारतींना व्यवस्थित ठेऊन ही मेट्रो सेवा सुरू केली. त्याबद्दल सर्व इंजिनिअरांचं अभिनंदन”, असं मोदींनी म्हटलं आहे.
“आज महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआयसह अनेक कॉलेजमध्ये नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, हाइड्रोजन, सोलर एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन अशा नवीन गोष्टी शिकायला मिळतील. या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. बा. पाटील यांचं कार्य देखील आठवतं. दि. बा. पाटील यांचं कार्य प्रेरणादायी आहे. यांचं संपूर्ण जीवन प्रेरणा देतं. आज आपण मागच्या १२ वर्षांत वळून कामे पाहिले तर अनेक मोठमोठी कामे झाले आहेत. नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.
