नागेश्वर पतसंस्थेला ‘उत्कृष्ट सहकारी संस्था ‘ पुरस्काराचा सन्मान
खंडाळा : पारदर्शक कारभार आणि काटेकोर नियोजनाच्या बळावर नागेश्वर पतसंस्थेने १०० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात अग्रेसर व आर्थिक सक्षम असणारी पतसंस्था असा नावलौकिक मिळाला आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय कामागिरीबद्दल ‘ उत्कृष्ट सहकारी संस्था ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान या राष्ट्रीय स्तरावर सहकार प्रशिक्षण व संशोधन कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट सहकारी संस्था २०२४ पुरस्कारासाठी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शंभर कोटी पेक्षा जास्त व्यवसाय असणाऱ्या संस्थेच्या कारभाराची चाचपणी करून ही निवड करण्यात आली.
राष्ट्रीय सहकार निती आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर निबंधक सहकारी संस्था ज्योती मेटे , वैमनीकॉमच्या संचालिका हेमा यादव , दुरदर्शनचे प्रमुख प्रकाश बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. हा मानाचा पुरस्कार नागेश्वर बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय पवार , उपाध्यक्ष धनंजय बिडवे यासह संचालक मंडळ यांना प्रदान करण्यात आला.
॥ नागेश्वर बँकेला मिळालेला हा पुरस्कार संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, सर्व सेवक वृंद यांचा हा बहुमान आहे. संस्थेच्या शिरपेचात कार्यकाळातील आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. पारदर्शक कारभार, प्रामाणिक सेवक वर्ग व आमच्यावर विश्वास ठेवणारे सभासद यांचे बहुमूल्य योगदान व सहकार्यामुळे हे यश मिळाले. ॥ दत्तात्रय पवार, अध्यक्ष नागेश्वर बँक




