वनक्षेत्रात कचऱ्याचा मारा; नगरपालिकेवर वन विभागाचे गुन्हे!
महाबळेश्वर │ दि. २२ (प्रतिनिधी)महाबळेश्वर कचरा डेपोतील निष्काळजी कारभार उघडकीस आला आहे. डेपोची भिंत पडून कचरा थेट वन विभागाच्या हद्दीत घुसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज वन विभागाने घटनास्थळी धडक देत महाबळेश्वर नगरपालिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईने प्रशासन अक्षरशः खडबडून जागे झाले आहे.
शहरातून विलगीकरण करून जमा केलेला कचरा डेपोमध्ये पुन्हा एकत्र केला जात असून कचरा प्रक्रिया पूर्ण ठप्प आहे. त्यामुळे डेपो परिसरात प्रचंड कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. भिंत कोसळल्याने हा कचरा सरळ आरक्षित वनक्षेत्रात पसरल्याचे वन अधिकाऱ्यांनी पाहणीत स्पष्ट केले.वन परिमंडल अधिकारी सुनील लांडगे आणि करुणा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालीलप्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले:
लागू कलमे व शिक्षा
भारतीय वन अधिनियम 1927 — कलम 26(1)(द) व 26(1)(ह)
आरक्षित जंगलात नुकसान, बेकायदेशीर प्रवेश
→ ६ महिने कैद + ₹500 दंड (किंवा दोन्ही)
भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 — कलम 9
वन्यप्राण्यांना हानी/शिकार
→ ३ ते ७ वर्षे कैद + किमान ₹10,000 दंड
उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते यांनी पूर्वीच वनक्षेत्रात प्लास्टिक कचरा फेकणे व सांडपाणी सोडण्यावर कडक कारवाईचे आदेश दिले होते. आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.




