विमानतळाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी विमान सेवा बंद
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तासांसाठी बंद राहणार
मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरूस्तीसाठी गुरुवारी काही काळ विमान सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत धावपट्टी, विमानतळ परिसराची पायाभूत कामे केली जातील.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. त्यानुसार विमानांच्या वेळापत्रकाचे नियोजित करण्यात आले असून त्यामुळे कोणत्याही विमान उड्डाणावर आणि आगमनावर परिणाम होणार नाही. यातून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीलगतच्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यासारखी प्रमुख कामे करण्यात येणार आहेत. धावपट्टीच्या तपासणीअंती योग्य ती कार्यवाही करून ती सुरक्षित करण्यात येईल. संपूर्ण देखभाल प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सहा तासांच्या आत देखभाल-दुरूस्तीचे कामे केली जातील, अशी माहिती विमान प्रशासनाने दिली.




