शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
कराड -कृषी महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय, कराड व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव पाटील, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री. अभिजीत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शलाका थोरात व डॉ. मल्हारी जगताप, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. इंदिरा घोनमोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. स्नेहल जुकटे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम व उत्तम चिंतन असणे आवश्यक आहे. आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य असा मर्यादित विचार नसून त्यामध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक व आर्थिक आरोग्य यांचाही समावेश होतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणा-या व्यक्ती या मनुष्याला जीवनदान देण्यासाठी अखंड प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्या देवतुल्य असतात. प्रत्येकाने जीवनामध्ये निरोगी व आनंदी रहावे अशी अपेक्षा डॉ. शिवाजीराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
श्री. अभिजित पाटील यांनी जीवनाची अशाश्वता प्रकट करतानाच आरोग्य शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकारचा झटका आल्यास किंवा श्वसनाचा त्रास सुरु झाल्यास वैद्यकीय सहाय्य प्राप्त होण्यापूर्वी सामान्य व्यक्तीने संबधित व्यक्तीचा श्वास चालू राहावा यासाठी काय करावे याचे प्रात्यक्षिक डॉ. शलाका थोरात व डॉ. मल्हारी जगताप यांनी या शिबिरामध्ये करून दाखविले. तसेच सदर प्रात्यक्षिकाची उजळणी उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी यांचेकडून करून घेण्यात आली.
कृषी महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. घोनमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. साक्षी फडतरे व कु. श्रुती बाबर यांनी केले. डॉ. जुकटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.