दुष्काळी शेतकर्यांच्या मदतीसाठी आमदार मकरंद पाटील यांची धाव
दुष्काळ निधीतून ४४ कोटींचे वितरण , वाई खंडाळ्यातील शेतकर्यांना लाभ
खंडाळा : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करुन राज्यातील काही तालुक्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. सातारा जिल्हयातील खंडाळा आणि वाई तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आमदार मकरंद पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे खरीप हंगामा अंतर्गत दोन्ही तालुक्यातील सुमारे ४७ हजार शेतकऱ्यांना ४४ कोटी रुपयांचे दुष्काळ निधी त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले आहेत. ऐन दुष्काळात आर्थिक बळ मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ मधील राज्यातील तालुक्यांचे दुष्काळी मुल्यांकन केल्यानंतर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खंडाळा व वाई तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला होता. यासाठी स्थानिक आमदार मकरंद पाटील यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दोन्ही तालुक्यांमधील खरीप हंगाम कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेले क्षेत्र विचारात घेवून व प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी दुष्काळ निधीचे वितरण करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत वाई तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांच्या १९३३५ हेक्टर क्षेत्रासाठी २२ कोटी रुपये तर खंडाळा तालुक्यातील २२ हजार ५६९ शेतकर्यांच्या १६२६० हेक्टर क्षेत्रासाठी २१ कोटी ९५ लाख रुपये निधीचे वितरण थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारची मदत मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हयातील केवळ या दोनच तालुक्यात दुष्काळी योजना लागू झाल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतही इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात आला होता. वाई तालुक्यातील १५७६८ विद्यार्थी तर खंडाळा तालुक्यातील १४३८२ विद्यार्थ्यांना प्रतिदिन पोषण आहाराचा लाभ देण्यात आला.
॥ खंडाळा आणि वाई तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नास यश आल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही तालुक्यातील ४७ हजार शेतकऱ्यांना सुमारे ४४ कोटीचा निधी थेट खात्यावर वितरीत करण्यात आला. शेतकरी बांधवांना संकटात मदत करता आली याचे समाधान वाटते. मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहीलो आहे.
॥ मकरंद पाटील , आमदार
