मंत्रालयात पाणीटंचाई तीन दिवसांपासून ठणठणाट
मुंबई : नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील पाणीटंचाईवर चर्चा झाली. पण, राज्याचा गाडा हाकणाऱ्या दस्तूरखुद्द मंत्रालयातच तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे असल्याचे असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनातही ठणठणाट होता. अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे मंत्रालयाला टँकरच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.
मंत्रालयात तीन दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासह उपहारगृह, स्वच्छता गृहात पाण्याचा ठणठणाट आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेरून बाटली बंद पाणी आणावे लागत आहे. पाण्याअभावी पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही कोलमडून गेली आहे. उपहारगृहात खाद्यपदार्थ मिळत होते, पण पाणी नव्हते. बाहेरून बाटली बंद पाणी आणण्याची मुभा नसल्यामुळे लोकांच्या घशाला कोरड पडली होती.
तीन दिवसांपासून अशीच अवस्था असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी वैतागून गेले होते. स्वच्छता गृहांवर पाणी नाही, असे लिहिण्याची वेळ आली होती. पण, नेमकी पाणी टंचाई का निर्माण झाली आहे, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. मंत्रालयातील अधिकारी कमी आणि अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगत आहेत, तर बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी योग्य आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगत आहेत. गुरुवारी सायंकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले असले, तरीही प्रत्यक्षात पाणी टंचाई कायम होती.
