‘मिनी काश्मीर’ तापोळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी!महाबळेश्वर तालुक्यात दिवाळी हंगामाची उत्साहात सुरुवात
महाबळेश्वर-महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य तापोळा हे पर्यटनस्थळ सध्या पर्यटकांनी गजबजले आहे. दिवाळी सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक तापोळ्याकडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ‘महाराष्ट्राचे मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे तापोळा सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
चारही बाजूंनी पसरलेली दाट हिरवाई, वैगेरे नदीचा मंद प्रवाह, आणि कोयना जलाशयातील नितळ पाणी या साऱ्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटक हरवून जात आहेत. शिवसागर तलावावरील बोटिंगचा थरार तर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकत आहे. शिवसागर बोट क्लब, तापोळा मार्फत पर्यटकांसाठी विशेष बोट सफरीची सोय करण्यात आली आहे. या सफरीत आयलंड पॉईंट, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर आणि ऐतिहासिक वासोटा किल्ला या ठिकाणांना भेट देता येते.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले तापोळा परिसरातील छोटे छोटे फार्महाऊस, वैगेरे नदीच्या काठावरील सुंदर दृश्ये, शेतीवर आधारित कृषी पर्यटन प्रकल्प आणि घरगुती खाद्यसंस्कृती पर्यटकांना खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव देतात. या ठिकाणी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि साहसी प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.
महाबळेश्वरपासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळा हे शांत, हिरवेगार आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले ठिकाण आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या धुकट वातावरणात कोयना तलावाचा नजारा ‘मिनी काश्मीर’ची अनुभूती देतो.
याशिवाय येथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय जलाशयालगत असलेल्या हॉटेल रिव्हिएरामध्ये उपलब्ध असून, पर्यटकांची विशेष पसंती या ठिकाणी पडत आहे. उत्कृष्ट निवास, निसर्गसंपन्न परिसर आणि जलक्रीडांचा आनंद यामुळे तापोळा हे सध्या पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ ठरले आहे.





