सातार्यात गरजू पत्रकारांसाठी म्हाडातून घरे-मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा :सामाजिक तेढ रोखण्यात सातारच्या पत्रकारितेचे योगदान
सातारा :सातार्यातील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारी सातारची पत्रकारिता असून पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ज्या पत्रकारांना घरे नाहीत अशा गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पत्रकारांसाठी म्हाडातून घरे देण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रकार बांधवांसाठी त्यांनी मांडलेल्या मागणीबाबत आपण म्हाडामधून गरजू पत्रकारांना घरे देवू, अशी घोषणाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. दरम्यान, जातीय तेढ वाढणार नाही व सामाजिक सलोखा राखण्यात सातारच्या पत्रकारितेचे योगदान आहे, असे गौरवोद्गार ना.शिवेंद्रराजे यांनी काढले.
सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये 6 जानेवारी या पत्रकार दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, प्रभारी उपसंचालक वर्षा पाटोळे, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष सनी शिंदे उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारच्या पत्रकारितेला मोठा वारसा आहे. हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव एकजुटीने काम करत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. सातारची पत्रकारिता दर्जा राखणारी असून जिल्ह्यात कोणताही सामाजिक तिढा निर्माण होणार्या गोष्टी पत्रकार कधीही टोकाला नेत नाहीत. सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांचे योगदान राहिलेले आहे. सातार्यात गरजू व गरीब पत्रकारांना गृहसंकुल उभे करण्याचा प्रकल्प हाती घेण्याची मागणी हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी केली आहे. त्यानुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तातडीने जागेचा शोध घ्यावा. प्रकल्पाचा प्रस्ताव दोघांना विचारुन तयार करावा. आपण गरजू व गरीब पत्रकारांना म्हाडामार्फत घरे देण्यासाठी नक्की प्रयत्न करु. संघटनेने सुसज्ज असे सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे केले आहे. या भवनात आवश्यक त्या बाबींची पूर्तता जिल्हा नियोजन समितीमार्फत केली जाईल. शिवाय सातारा नगरपालिका देखभालीचे काम पाहील, असेही ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले. सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनीही पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मांडलेली भावना तसेच पत्रकारांच्या अडचणींसह सर्व विषय मार्गी लावण्यात माझे सहकार्य राहील, असेही ना.शिवेंद्रराजे म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, सातार्यात सातारा जिल्हा पत्रकार भवनाची ऐतिहासिक वास्तू आपल्या कारकिर्दीत उभी राहिली याचा आयुष्यभर अभिमान राहील. पत्रकारांच्या या वास्तूसाठी त्याकाळी एकमेकांच्या विरोधात असलेले खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रराजेही एकत्र आले होते, हेही आम्ही कधीही विसरणार नाही. या वास्तूत पहिला पत्रकार दिन होतोय आणि त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्रराजे उपस्थित आहेत याचीही इतिहास नोंद ठेवेल. पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक अधिस्विकृती कार्ड पुणे विभागात देण्यात आपण यशस्वी झालो आहे. संघटनेचे काम भविष्यातही तेवढ्याच आक्रमकतेने आपण सुरु ठेवू. ना.शिवेंद्रराजे मंत्री झाल्याने आम्हा सर्व त्यांच्या मित्रांना आपणच मंत्री झाल्याचा आनंद झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतून पत्रकार भवनाच्या देखभाल दुरुस्तीची कायमस्वरुपी तरतूद ना.शिवेंद्रराजेंनी करावी. सातार्यातील गरजू पत्रकारांना गृहसंकुलाचा प्रकल्प तयार करावा. सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकदिलाने असेच एकत्र रहावे, असेही पाटणे म्हणाले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, सातार्यात आम्ही सर्वांच्या सहकार्याने सातारा जिल्हा पत्रकार भवन उभे करु शकलो. या पत्रकार भवनात यापुढे पत्रकार परिषदा व कार्यक्रम होतील. ना.शिवेंद्रराजेंच्या मंत्रीपदाचा आम्हा सर्व मित्रांना आनंद आहे. त्यांनी सातार्यातील गरीब पत्रकारांसाठी म्हाडामार्फत गृहप्रकल्प तयार करावा. सातार्याच्या पत्रकारितेचे व ना.शिवेद्रराजेंचे अनोखे नाते आहे. ते आणखी वृध्दींगत होईल. सातारा पत्रकार संघाने पहिलाच कार्यक्रम दणक्यात केला. नव्या कार्यकारिणीने आणखी उपक्रम राबवावेत.
पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे प्रास्ताविकात म्हणाले, सातारा पत्रकार संघ व सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार हितासाठी उपक्रम राबवले जातील. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच पत्रकारांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सहकार्य करावे.
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन झाली. यानंतर मान्यवरांचे तसेच नवनिर्वाचित सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा पत्रकार भवनाच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली. सूत्रसंचालन अरुण जावळे यांनी केले तर आभार अमित वाघमारे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे, राहूल तपासे, सुजीत आंबेकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश भांबरे, सचिव गजानन चेणगे, खजिनदार अमित वाघमारे, संघटक अजित जगताप, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत देवरुखकर, अरुण जावळे, मनोज पवार, सचिन काकडे, रिझवान सय्यद, मीना शिंदे, गौरी आवळे तसेच सातार्यातील पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते.