महाबळेश्वरमध्ये नाट्य स्पर्धेद्वारे स्वच्छतेचा संदेश, विद्यार्थ्यांनी रेखाटल्या नाविन्यपूर्ण कल्पना..
महाबळेश्वर, दि. २० जानेवारी २०२५: स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने आयोजित केलेल्या नाट्य स्पर्धेने शहरात स्वच्छतेची चळवळ उभी केली. गिरीस्थान प्रशालेत झालेल्या या स्पर्धेत शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेवर आधारित नाटकांची सादरीकरणे केली.
इयत्ता ५ ते ७ वी आणि ८ ते ९ वी या दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘महाबळेश्वर शहराचा वारसा’, ‘प्लास्टिक शाप कि वरदान’, ‘वसुंधरेचे जतन व संवर्धनाची गरज’ आणि ‘स्वच्छता व आरोग्य’ यासारख्या विषयांवर आधारित नाटके सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तर पहिल्या तीन आणि उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक वस्तू देऊन गौरवण्यात आले.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
