बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन, साताऱ्यात राष्ट्रवादीच्यां प्रमुख नेत्यांची बैठक
सातारा : जावळी तालुक्यातील बोंडारवाडी महू, हातेघर, आंबळे या धरणांची कामे मार्गी लागण्यासाठी मी आग्रही आहे. मला या कामाचे श्रेय नको पण लोकांना पाणी मिळाले पाहिजे असे स्पष्टीकरण खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संवाद बैठकीत उदयनराजे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, सातारा शहराध्यक्ष एडव्होकेट बाळासाहेब बाबर ,जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, माजी सभापती सुनील काटकर, सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र लवंगारे , सागर भोगावकर, नितीन शिंदे, साधू चिकणे , जिल्हा महिला कार्याध्यक्ष सीमाताई जाधव यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, या निवडणुकीत घटक पक्षांना योग्य तो सन्मान दिला जाईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समन्वय ठेवून लोकसभेचा प्रचार करायचा आहे.
अमित कदम म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा प्रचार करण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना सर्वच पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आम्ही सर्वांनी उदयनराजेंच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. एडव्होकेट बाळासाहेब बाबर यांनी लोकसभा प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी अशी मागणी या बैठकीत केली.