महाबळेश्वर तालुक्यात ” राज” की बात
भिलार प्रतिनिधी -महाबळेश्वर तालुक्यात ‘वेट अँड वॉच’; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट होणार? राजकीय नेत्यांच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष!
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीने सध्या तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 27 जानेवारी पर्यंत नामनिर्देशक फॉर्म मागे घेण्याची अंतिम तारीख आहे या तारखेपर्यंत कोण कोण आपले अर्ज माघारी घेते व कोण बंडखोरी करते हे 27 तारखेलाच ठरणार आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांकडून इच्छुकांनी अर्जांचा पाऊस पाडला आहे. मात्र, आता खरा ‘ट्विस्ट’ उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत येणार असून, कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याचा फैसला बड्या नेत्यांच्या दरबारी होणार आहे. यातच कोणाला उमेदवारी द्यायची व कोणाला माघार घ्यायला लावायची हे अगोदरच ठरल्याप्रमाणे होईल की कोण बंड करेल याबाबत हे मोठे सस्पेन्स दडले आहे
राष्ट्रवादीत ‘आबां’चा शब्द अंतिम, राजपुरेंचा सल्ला मोलाचा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी आमदार मकरंद आबा पाटील हे कंबर कसून तयार आहेत. पक्षातर्फे अधिकृत उमेदवार कोण असेल, याचा अंतिम निर्णय ‘आबा’च घेणार असले तरी, यामध्ये राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मताला विशेष वजन दिले जात आहे. या दोघांची जोडी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
भाजपमध्ये भिलारे-भोसले जोडीवर जबाबदारी
भारतीय जनता पक्षातही इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल भिलारे आणि माजी आमदार मदन भोसले हे सध्या ‘फिल्डिंग’ लावण्यात व्यस्त आहेत. कोणाला रिंगणात उतरवायचे आणि कोणाची नाराजी दूर करून अर्ज मागे घ्यायला लावायचा, याचा मास्टर प्लॅन ही जोडी तयार करत आहे. शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या भाजपमध्ये कोणाला ‘कौतुक’ मिळते आणि कोणाला ‘त्याग’ करावा लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शिवसेनेचे ‘रिमोट कंट्रोल’ ठाण्यात!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतूनही अनेक शिलेदारांनी दंड थोपटले आहेत. मात्र, येथील उमेदवारीचे गणित स्थानिक पातळीवर सुटण्याऐवजी ‘ठाण्यावरून’ येणाऱ्या आदेशावर अवलंबून आहे. वर्षा निवासस्थान किंवा ठाण्यातून मिळणारा ग्रीन सिग्नलच येथील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.
कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांना मानणारा वर्ग महाबळेश्वर तालुक्यात आहे बाळासाहेब भिलारे यांचे चिरंजीव नितीन भिलारे व तेजस्विनी भिलारे यांना आपल्या सोबत घेऊन मतदान आपल्या बाजूने होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत त्यात हे कुटुंब कोणाला साथ देते हेही महत्त्वाचे आहे त्यामध्येच तळदेव गटात बाळासाहेब भिलारे यांना मानणारा वर्ग असल्यामुळे भिलारे कुटुंब संजूबाबा गायकवाड संजय मोरे व अन्य उमेदवार यांच्या प्रचारासाठी भाग घेणार तटस्थ राहणार हे येणारा काळच सांगेल
कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांकडून सध्या ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक धक्कादायक निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय वर्तुळातील चर्चा: “उमेदवारी मिळवणे सोपे आहे, पण ती टिकवून मित्रपक्षांच्या नाराजीला थोपवणे हेच नेत्यांसमोरचे खरे आव्हान आहे.”



