हाँगकाँगमध्ये भीषण आग; 44 मृत्युमुखी, 45 गंभीर जखमी
हाॅंगकाँगच्या ताई पो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागली आहे. या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 45 जणांची प्रकृती गंभीर आहे. आणखी 279 जण बेपत्ता आहेत.
घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पळणारे लोक स्पष्ट दिसत आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार ही आग हाँगकाँगमधील ‘वांग फुक कोर्ट’ नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लागली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आठ ब्लॉक्स असून एकूण दोन हजार फ्लॅट्स आहेत.
हाँगकाँग सरकारच्या माहितीनुसार, वांग फुक कोर्टमध्ये ही आग दुपारी सुमारे 2 वाजून 51 मिनिटांनी भडकली आणि त्यानंतर अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.
या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यापैकी दोन जण बांधकाम कंपनीचे संचालक असून एक जण अभियांत्रिकी सल्लागार आहे.आगीचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलीस्टायरीन बोर्ड आढळले आहेत. इमारतीत नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि या बोर्डांमुळे आग वेगाने पसरली असावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग बांबूच्या परांचीमुळे शेजारच्या इमारतींमध्येही झपाट्याने पसरली.
आज सकाळीही काही टॉवर ब्लॉक्समधून धुराचे लोट निघत आहेत. मात्र आठपैकी चार इमारतींमध्ये आग नियंत्रणात आली आहे.अग्निशमन विभागाला ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल, असा अंदाज आहे.
शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले असून ज्यांना स्थलांतराची गरज आहे त्यांच्यासाठी आपत्कालीन निवास युनिट्स उपलब्ध करून दिली जात आहेत.
हाँगकाँग अग्निशमन विभागाने या आगीला पाचव्या स्तराचा अलार्म दिला आहे. हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची आग 17 वर्षांपूर्वी लागली होती.
हाँगकाँगमध्ये असलेल्या बीबीसीच्या संवाददाता फिबी कांग यांनी सांगितले की, ताई पो रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताच धुराचा तीव्र वास नाकात शिरतो. हे स्टेशन घटनास्थळापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे.
या स्थळी जाताना आम्हाला अनेक लोक आगीने वेढलेल्या इमारतींकडे पाहताना दिसले. तिथे डझनभर फायर ट्रक उभे होते आणि अजूनही एकामागोमाग अनेक ट्रक येत होते. . या ट्रक मधून अग्निशमन दलाचे जवान स्वतःसाठी ऑक्सिजन टँक आणत होते
ताई पोचे डिस्ट्रिक्ट कौन्सिलर मुई सियू-फंग यांनी बीबीसी चायनीज सेवेला सांगितले की, सुमारे 95 टक्के लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे आणि जवळच्या तीन हाऊसिंग ब्लॉक्स रिकामे करण्यात आले आहेत.हाँगकाँगच्या परिवहन विभागानुसार, “अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि 30 हून अधिक बस मार्गांना दुसऱ्या भागातून वळवण्यात आले आहे.”
विभागाने हेही सांगितले की, आग सुरू असताना ते रिअल-टाइम ट्रॅफिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
वांग फुक कोर्टमधील रहिवासी हॅरी च्योंग यांनी रॉयटर्सला सांगितले की, सुमारे दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी एक जोरदार आवाज ऐकला आणि शेजारच्या ब्लॉकमध्ये आग भडकताना पाहिली.
हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅट्ससाठी ओळखल्या जातात, तिथे इमारतींमधील अंतर खूपच कमी असते.याच घनतेमुळे या घटनेत मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
वांग फुक कोर्टमधील फ्लॅट्सचा आकार साधारणतः 400 ते 500 चौरस फूट असतो. हा कॉम्प्लेक्स समुद्रकिनारी आणि प्रमुख महामार्गाजवळ आहे, आणि सरकारी आकडेवारीनुसार येथे सुमारे 4,600 लोक राहतात.
आग झपाट्याने पसरण्यामागे कारण म्हणून आसपास सुरू असलेले दुरुस्तीचे काम सांगितले जात आहे. इमारतींच्या बाहेर दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या परांची लावल्या होत्या.




