Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » मनसैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा!” राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा

मनसैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा!” राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा

मनसैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा!” राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा

महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार, राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार, मनसैनिकांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. आता यावरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे. त्यांनी यासाठी सोशल मीडियावर पत्र लिहित मनसैनिकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटलं आहे, ‘सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.’

‘पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?’, असं राज ठाकरे म्हणाले.

‘आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की’, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं.

‘त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील’ , असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 8 कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात . एकतेचे प्रतीक म्हणून, कराडमधील कोटा

Live Cricket