३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ पोलिसांची कारवाई; बेकायदा दारू विक्रीप्रकरणी एकास अटक
पाटण -३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ पोलिसांनी बेकायदा व बिगरपरवाना विदेशी दारू विक्री करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करत ₹१६,०८०/- किमतीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत उत्तम चंद्रु काजारी (वय ६३, रा. काजारवाडी, खळे, ता. पाटण, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे सोनाईचीवाडी (ता. पाटण) येथील मारूल ओढ्याजवळ झुडपांच्या आडोशाला आरोपी बेकायदा विदेशी दारूची चोरटी विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दुपारी सुमारे १.०० वाजता अचानक छापा टाकला.
छाप्यात आरोपीकडून विविध ब्रँडची सिलबंद विदेशी दारू आढळून आली. यामध्ये मास्टर्स डिलाईट व्हिस्की, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू, ग्रँड मास्टर्स, मँगो व क्रॅनबेरी व्होडका अशा विविध प्रकारच्या एकूण ₹१६,०८०/- किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
सदर दारू आरोपीकडे बेकायदा, बिगरपरवाना व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




