माजी खासदार स्व लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी बोपेगावात होणार नामदार मकरंदआबाचा भव्य नागरी सत्कार
सातारा प्रतिनिधी -सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या युगाचे प्रवर्तक, बँकिंग, सहकार अन लोककल्याणाचे व्यासपीठ असणारे माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील ह. भ. प. पद्माकरमहाराज देशमुख यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. जयंतीचे निमित्त साधुन वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार मकरंदआबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल बोपेगांव ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार मंगळवार दि. २५ रोजी सायंकाळी ४ वाजता बोपेगाव (ता. वाई) येथे करण्यात येणार असल्याची माहिती, बोपेगांब ग्रामस्थांच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, आमच्या गावचे सुपुत्र स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात सरपंच पदापासुन केलेली होती. स्व. तात्यांनी बँकंग, सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमठवलेला होता. लोकसभेवर खासदार म्हणुन सलग दोन वेळा काम केलेले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, किसन वीर कारखान्याच्या माध्यमातुन जनसामान्य जनतेच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केलेले होते. स्व. तात्यांच्या पश्चात वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार मकरंदआबा पाटील यांनी विधानसभेमध्ये सलग ४ टर्म चढ्यामताने निवडुण येऊन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर केलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मकरंदआबांना मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री तसेच बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळालेली आहे. आमदार मकरंदआबा पाटील हे नामदार झाल्यामुळे आंम्हा बोपेगांव ग्रामस्थांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. स्व. तात्यांनी ज्याप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये राहिलेले होते त्याप्रमाणे नामदार मकरंदआबा पाटील हे मंत्री होऊनही आजही ते सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्येच रमलेले दिसुन येतात. नामदार मकरंदआबांचा सत्कार आम्ही इतर कोणत्याही दिवशी घेऊ शकलो असतो परंतु स्व. तात्यांच्या जयंतीदिनी हा सत्कार आयोजित केल्यामुळे आमच्या बोपेगांवकरांसाठी हा दुग्धर्शकरा योगच आहे. नामदार मकरंआबा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील व फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहितीही बोपेगाव ग्रामस्थांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेली आहे.
माजी खासदार स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांच्या ८७ व्या जयंत्तीनिमित्त होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमास जिल्ह्मातील तात्याप्रेमी व नामदार मकरंदआबा पाटीलप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही बोपेगांव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
