माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणातून सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार!
मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सक्षमीकरणाबाबत सादरीकरण बैठक पार पडली.मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून राज्य शासनाच्या विविध विभागांतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनेक सेवांचा पुरवठा या विभागामार्फत होत असतो. त्यामुळे लवकरच माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करण्यात येईल.
राज्यातील नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी एक स्वतंत्र संस्था लवकरच स्थापन करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करून डिजिटल महाराष्ट्र या संकल्पनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्याचा शासनाचा ठाम निर्धार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शासनाच्या सर्व सेवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बिग डेटा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.





