‘माहेश्वरी वाॅकेथान’चे साताऱ्यात गुरुवारी आयोजन _
आरोग्यविषयक जनजागृतीसाठी सातारा शहर माहेश्वरी सभा यांचा उपक्रम_
सातारा/ प्रतिनिधी-सातारा शहर माहेश्वरी सभा यांच्यातर्फे (कै.) माणिकलाल श्रीकिसनजी कासट यांच्या स्मरणार्थ गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी माहेश्वरी समाजातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘माहेश्वरी वाॅकेथान- 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहर माहेश्वरी सभा या माहेश्वरी समाजबांधवांच्या संस्थेचे अध्यक्ष मनीष लाहोटी व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन जीवनक्रमात व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन समाजबांधवांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये व्यायाम व चालण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने (कै.) माणिकलाल श्रीकिसनजी कासट यांच्या स्मरणार्थ गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी माहेश्वरी समाजातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘माहेश्वरी वाॅकेथान- 2024’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता मारवाडी चौक (खण आळी) येथून वाॅकेथानला सुरुवात होणार आहे. तेथून देवी चौक- कमानी हौद मार्गे नगरपालिका कार्यालयापर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने राजवाड्यावरील गोल बागेस वळसा घालून पुन्हा सहभागी सर्व वाॅकेथानपटू मारवाडी चौकात परत येतील व तेथे या उपक्रमाचा समारोप होईल. वाॅकेथान मध्ये सहभागासाठी दीडशे समाज बांधवांनी नाव नोंदणी केली आहे सातारा शहर माहेश्वरी सभा यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात, त्यास अनुसरून होत असलेल्या ‘वाॅकेथान- 2024’ बाबत मोठे औत्सुक्य व्यक्त होत असून या उपक्रमाच्या नियोजनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजकांतर्फे प्रसिद्धीस देण्यात आली आहे.