Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाशिवरात्रीतील शिवदर्शन सफर

महाशिवरात्रीतील शिवदर्शन सफर 

महाशिवरात्रीतील शिवदर्शन सफर 

नमस्कार मंडळी ……कसे आहात ……फेब्रुवारी महिना सुरु झाला कि शिवजयंती आणि महाशिवरात्रीचे वेध शिवभक्तांना लागतात. या फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी मी प्रा.सुर्यकांत अदाटे सातारा न्यूज मिडिया सेवेनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिध्द बारा शिवमंदिरांचे दर्शन आपल्याला आज घडविणार आहे.

प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्याद बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारीमध्ये येणार्या् महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे म्हणजे महाशिवरात्री साजरी करणे होय.

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला भगवान शिवशंकर महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. भक्तगण शिवशंकराच्या मंदीरात दर्शन घेण्यासाठी जातात. महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिवशंकर आणि पार्वतीच विवाह झाला होता.

जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिवशंकर आशीर्वाद देतात असा समज भक्तगणआणि भाविकांच्यात आहे. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते. या दिवशी भगवान शिवशंकराची उपासना केली आते. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आपल्याला करून देतो. या दिवशी भगवान शिवशंकर यांचे स्मरण केले जाते. शिवप्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

महाशिवरात्रीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- “मला मार पण इतराना सोडून दे.” हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा प्रकार आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. फेब्रुवारी महिन्यातील महाशिवरात्रीला शिवभक्तांची अलोट गर्दी आपल्याला प्रत्येक शिवमंदिरामध्ये पहावयास मिळते. प्राचीन काळापासूनच पवित्र अशा महाराष्ट्र भूमीतील भगवान शिवशंकरांच्या मंदिरांची पूजा महाशिवरात्रीदिवशी केली जाते. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बारा महादेव मंदिरांची केलेली दर्शन यात्रा….

१. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग:

नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर शिवमंदिर वसलेले असून गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळील भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे मंदीर आहे. हे ठिकाण पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासाठी सुद्धा ओळखले जाते. हा परिसर हिरवेगार डोंगर आणि अंजनेरी पर्वत यांनी वेढलेला आहे.

२. भीमाशंकर ज्योतिर्लिंग:

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर हे भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ सह्याद्री पर्वतरांगांच्या घाट प्रदेशात वसलेले असून हे भगवान शिवशंकर यांचे प्राचीन मंदिर आहे. उंच पर्वतरांगांच्या सभोवतालची घनदाट जंगले, वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातींचे हे निवासस्थान आहे. भीमा नदी, हिरवीगार दरी आणि हिल स्टेशन यामुळे पर्यटकांची रीघ या ठिकाणी लागलेली असते.

३. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग: 

औरंगाबाद जिल्ह्यातील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा उल्लेख शिवपुराणात आढळ‌तो आणि ते भारतातील १२ वे ज्योतिर्लिंग मानले जाते. अनेक भारतीय देवी-देवतांच्या सुंदर कोरीवकाम आणि शिल्पांसह लाल खडकांनी बांधलेले हे मंदिर आणि मंदिराच्या आतील कलाकुसर यासाठी ते ओळखले जाते.

४. औंढा नागनाथ मंदिर:

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले असून हे ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या मंदिरात असणारी विश्वसनीय सुंदर कलाकुसर आणि कोरीव कामांसाठी हे मंदीर प्रसिध्द असून ते मंदीर पाहण्यासारखे आहे.

५. कैलास शिवमंदिर:

एलोरा येथील कैलास मंदिर हे भगवान शिवाच्या प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. कैलास मंदिर कैलास पर्वत, भगवान शिव शंकराचे घर आणि एकाच खडकात कोरलेल्या मेगालिथची आठवण करण्यासाठी हे डिझाइन केलेले आहे. हे भारतातील सर्वात प्रसिद्ध भगवान शिवमंदिरांपैकी एक आहे. 

६. अंबरनाथ शिवमंदिर:

अंबरनाथ हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे आणि अंबरेश्वर शिवमंदिर हे वडवण नदीच्या काठावर वसलेले आहे. हे मंदीर त्याच्या हेमाडपंथी शैलीसाठी ओळखले जाते.एका भव्य दगडांवर सुंदर कोरलेले आहे. भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी हे मंदिर महाशिवरात्रीत गर्दीने फुलून जाते. 

७. कोपेश्वर शिवमंदिर:

कोल्हापूर जिल्ह्यात हे कोपेश्वर मंदिर वसलेले असून ते खिद्रापूर येथे आहे. या प्रसिध्द मंदिरात देवता आणि धर्मनिरपेक्ष आकृतींचे अप्रतिम असे नक्षीकाम आहे. कोल्हापुरातील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या खिद्रापूरमध्ये हे मंदिर एक लपलेले रत्न म्हणूनही ओळखले जाते.

८.वैजनाथ शिवमंदिर:

महाराष्ट्रातील परळी येथील वैजनाथ मंदिरात बीड जिल्ह्यात असलेल्या महाशिवरात्री उत्सवात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा भरते. परळी शिवमंदिर हे भारतातील अतिशय प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आणि भगवान महादेवाचे सर्वात शक्तिशाली असे स्थान आहे. 

९.भुलेश्वर शिवमंदिर:

पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे ४५ किमी अंतरावर भगवान शिवशंकर यांचे श्री भुलेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर एका टेकडीवर वसलेले असून ते तेराव्या शतकात बांधले गेले आहे. अलीकडे त्याचा समावेश संरक्षित स्मारक यामध्ये करण्यात आलेला आहे.

१०. मार्लेश्वर शिवमंदिर:

मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्या एकत्र ज्याठिकाणी वाहतात त्या ठिकाणी संगमेश्वर हे ठिकाण आहे. मार्लेश्वर गुंफा शिवमंदिर हे देवरूखपासून १७ किमी अंतरावर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेत असलेले लेणी मंदिर आहे.

११. अमृतेश्वर शिवमंदिर:

अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावातील अमृतेश्वर हे शिवमंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. रतनवाडीचे हे सुंदर दगडी कोरीव शिवमंदिर महाराष्ट्रातील भगवान शिवमंदिरांपैकी एक आहे. 

१२. गोंदेश्वर शिवमंदिर:

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील श्री गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधले गेले आहे आणि या मंदिरावरील भिंतीवर अतिशय सुंदर दगडी कोरीव काम व कलाकुसर अप्रतिम असे हे मंदीर पाहण्यासारखे आहे. गोंदेश्वर मंदिराचे मुख्य देवस्थान भगवान शिवाला समर्पित आहे.

अध्यात्माच्या मार्गावर असणार्याा तसेच महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा महाशिवरात्र ही अतिशय महत्वाची आहे. महत्वाकांक्षी व्यक्ती हा दिवस शिवशंकरांनी त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात. योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. 

महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त भाविक मनापासून उपवास करतात, भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येदेखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच, शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.

सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे

प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,

देऊर

९९७५७५९३२५

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 522 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket