महाराष्ट्र राज्य सीईटी सेलतर्फे एमबीए व एमसीए सीईटीचे वेळापत्रक जाहीर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; यशोदा मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष कार्यान्वित
सातारा प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष , मुंबई यांनी एमबीए (MBA) व एमसीए (MCA) अभ्यासक्रमांसाठी सीईटी २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रक्रियेबाबत वेळेत माहिती घेऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एमबीए सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२६, तर एमसीए सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच एमसीए सीईटी परीक्षा दि. ३० मार्च २०२६ रोजी, तर एमबीए सीईटी परीक्षा दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
एमबीए व एमसीए हे अभ्यासक्रम आजच्या स्पर्धात्मक युगात करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर विकास, डेटा विश्लेषण, प्रशासन व उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी सीईटीच्या अर्ज प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
सीईटी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवरच अर्ज करावा, आवश्यक कागदपत्रे अचूक भरावीत, छायाचित्र व स्वाक्षरी योग्य स्वरूपात अपलोड करावी तसेच अंतिम तारखेपूर्वी अर्ज निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकदा माहितीअभावी किंवा विलंबामुळे विद्यार्थी संधीपासून वंचित राहतात. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्यांना वेळापत्रक समजावून सांगून योग्य मार्गदर्शन करणे तितकेच आवश्यक आहे.
शैक्षणिक संस्थांनीदेखील या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन व माहिती सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास व वेळेचे व्यवस्थापन केल्यास सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश निश्चित मिळू शकते.
एमबीए व एमसीए सीईटी संदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य व अधिकृत माहिती मिळावी, यासाठी यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा येथे ‘प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या मार्गदर्शन कक्षामार्फत सीईटी अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, तसेच अभ्यासक्रम व करिअर संधींबाबत मोफत व तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमाहितीला बळी न पडता अधिकृत प्रक्रियेनुसार प्रवेश घ्यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अजिंक्य सगरे (उपाध्यक्ष)
“एमबीए व एमसीए सीईटी हे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारे महत्त्वाचे टप्पे आहेत. राज्य सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तत्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. पालकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करावे. योग्य नियोजन, वेळेवर अर्ज व नियमित अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी ही संधी गंभीरपणे घ्यावी.”




