महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडणार.. उद्धव-राज ठाकरे एकत्र मोर्चात
मुंबई -हिंदी सक्तीविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असताना असून विविध राजकीय पक्षांनी याविषयीं ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला होता. हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको,असा मनसेचा आग्रह होता. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत राऊतांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चामध्ये एकत्र पहायला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत असून त्याची पहिली झलक कदाचित हिंदी सक्तीविरोधातील या मोर्च्यामधून दिसू शकते. 5 जुलै रोजी या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्च्याचं नेतृत्व करताना पहायला मिळू शकतात. त्याचसोबत इतरही राजकीय पक्षातील नेते या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
