- महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही-राज ठाकरे
मुंबई -देशभरात नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्याला आता मनसेच्या राज ठाकरेंनी विरोध केला आहे. हिंदी ही काही राष्ट्र भाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती करु नये असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात जर हिंदी सक्ती करणार असाल तर दक्षिण भारतातही ती लागू करणार का असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंदेशभरात नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याची निर्णय घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाला महाराष्ट्र सरकारनेही मान्यता दिली आहे. त्यावर राज ठाकरेंनी हा इशारा दिला आहे
सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.
प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
