महाराष्ट्र–कॅनडा: विकास, गुंतवणूक आणि नवसंधींचा नवा अध्याय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद व त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी तंत्रज्ञान, शिक्षण, वित्त, व्यापार, गुंतवणूक, उद्योग यासह विविध बाबींवर चर्चा झाली.
भारत आणि कॅनडा या दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील दीर्घकाळ असलेल्या मैत्रीपूर्ण धोरणामध्ये वाढ होत आहे. या कालखंडात कॅनडाच्या उद्योजक, व्यापार कंपन्यांसाठी महाराष्ट्रातील संधी या विकासातील भागीदारी आणि सहकार्याच्या नव्या उंची गाठतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे उद्योगस्नेही धोरण, तंत्रज्ञान, पायाभूत व ऊर्जा क्षेत्रातील विकासामुळे थेट परकीय गुंतवणुकीसाठी प्राधान्याचे ठिकाण ठरले आहे. भारत आणि कॅनडामध्ये सहकार्याचे नवीन बंध निर्माण होत असताना, महाराष्ट्रात व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, ऊर्जा, उद्योग, डेटा टेक्नॉलॉजी क्षेत्रात अभूतपूर्व संधी आहे. भारताची आर्थिक प्रगती विलक्षण आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई ही देशाची आर्थिक, औद्योगिक, करमणूक, स्टार्टअप क्षेत्रातील राजधानी आहे. भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार आहे. या प्रवासात कॅनडाने भारताचे भागीदार व्हावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी कॅनडा शिष्टमंडळातील सदस्य व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
