महाबळेश्वरमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ
महाबळेश्वर: केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत महाबळेश्वरमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ सुरू झाला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून, शहरात स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवणे आणि स्वच्छतेचा प्रचार-प्रसार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या पंधरवड्याचा शुभारंभ १७ सप्टेंबर २०२५ रोजी गिरीस्थान प्रशाला येथे स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ढोबळे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्री. अमित माने, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री. प्रदीपकुमार बोरगे, संगणक अभियंता श्री. मंगेश माने, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे, लेखापाल श्री. ज्ञानेश्वर मोहिते, लेखापरीक्षक श्री. सचिन कदम, तसेच स्वच्छता मुकादम श्री. मनोज चव्हाण आणि श्री. अयुब वारुणकर यांचा समावेश होता.
याशिवाय, गिरीस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हिलदारी संस्थेचे श्री. राम भोसले व त्यांची टीम यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या पंधरवड्यादरम्यान शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यात महिलांसाठी कचरा वर्गीकरणावर सामुदायिक बैठका, शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, ‘रेड डॉट’ बैठका, स्वच्छता अभियान, एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यांचा समावेश आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्ये, स्वच्छता फेरी, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान व त्यांच्या शासकीय योजनांमध्ये नोंदणीसारखे उपक्रमही घेतले जातील.
या स्वच्छता पंधरवड्यात शहरातील सर्व शाळा, हॉटेल्स, सामाजिक संस्था, संघटना, शासकीय संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाबळेश्वरला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी केले आहे.





