महाबळेश्वरमध्ये अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
महाबळेश्वर-पर्यटन हंगामात महाबळेश्वरमध्ये अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक बोट क्लब, बॉम्बे पॉईंट आणि मुख्य बाजारपेठ यांसारख्या प्रमुख ठिकाणी पर्यटकांच्या वाहनांचे बेकायदा थांबणे व पार्किंग केल्यामुळे रस्ते अरुंद होत असून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे.
अवैध पार्किंगमुळे शहरातील मुख्य मार्गांवरून वाहनांना सुरळीतपणे जाणे अवघड होत आहे. पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. यामुळे पर्यटनाचा आनंद घ्यायला आलेल्या पाहुण्यांचा मूड खराब होतो, तर स्थानिकांच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे आणखी एक गंभीर धोका म्हणजे, एखादी अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने किंवा पोलिस पथके वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. यामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाकडे अवैध पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पार्किंगसाठी ठराविक जागा निश्चित करणे, सीसीटीव्ही व पोलिस गस्त वाढवणे आणि दंडात्मक कारवाई करणे या उपायांचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहे.
महाबळेश्वर हे देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण असल्याने, वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंगसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे सर्वांचेच मत आहे.





